संकटमोचक म्हणजे मोठी भरती अटळ; नाशकात विरोधकांचा सुफडा साफ, सोलापूरच्या "यार्डात मार्केट"!धर्मरक्षकमंत्री विठुराया चरणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर महायुतीत जोरदार इनकमिंग सुरू आहे. "सब का साथ, एकनाथ" यांनी कंबरच कसली. कदाचित भाजपाला (फडणवीसांना) नडणार की काय? अशी शंका. त्यामुळे सत्ताधार्‍यांतच "महायु(ध्द)"ती होईल की काय? शह काटशहच्या राजकारणात फडणवीसांचे संकटमोचक सोलापुरात आले आहेत. अर्थात भाजपात मोठी भरती अटळ मानली जात असून "यार्ड"मध्ये "मार्केट" भरणार असल्याची ही हाळी? महाजन म्हणजे त्याच्या गळाला मोठा मासा लागणार. नाशकात त्यांनी विरोधकांचा सुफडा साफ केला, आता लक्ष्य सोलापूर...

Jul 4, 2025 - 13:14
 0  224
संकटमोचक म्हणजे मोठी भरती अटळ; नाशकात विरोधकांचा सुफडा साफ, सोलापूरच्या "यार्डात मार्केट"!धर्मरक्षकमंत्री विठुराया चरणी

 (विजयकुमार पिसे) 
 राज्याचे जलसंधारणमंत्री तथा भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कालच विठुरायाचे दर्शन व व्यवस्थेची पाहणी केली.  आपत्ती व्यवस्थापनमंत्री महाजनांनीही वारीच्या नियोजनाची पाहणी केली. ही चढाओढ आणि श्रेयवाद आहे, हे लक्षात येते.  याशिवाय धर्मरक्षकमंत्री नीतेश राणे हे देखील आज पंढरीची वारी सोलापूरमार्गे करण्यासाठी येत आहेत, अशी नवी माहिती. एकाच दिवशी दोन मंत्री! अजीतदादांचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही भविष्यवाणी केली आहे, पुढच्या आषाढी वारीची महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजीतदादा करणार! याचा अर्थ महायु(ध्द)तीत काहीतरी शिजते आहे. 
   शिंदे यांच्या दौर्‍यामुळे शिवसैनिकांना हुरूप आला. त्यामानाने भाजपात सामसूम. कारण बडे नेते, मंत्री येतात, पण कार्यकर्त्यांची धावतीच भेट होते. (गेल्या आठवड्यात सुनील जी देवधर आले होते, पण ते कुठल्याच सत्तेत नसल्यामुळे बुध्दीवंतान्ची हवी तशी गर्दी दिसली नाही). शहराला नवीन अध्यक्ष मिळालेत, शहर पदाधिकारी देखील नवे असतील की, पूर्वीचीच टीम कायम ठेवणार, ही उत्सुकता आणि अस्वस्थता. शहरातील सर्व सहा मंडल अध्यक्ष तीन महिन्यापूर्वी निवडले. परंतु त्यांच्या टीमला अजून गडी मिळाले नाहीत.(का?), ही ताजी माहिती आहे.
    गिरीश महाजन म्हणजे त्यांच्या गळाला बडा मासा हमखास लागणार. कालच नाशकातील हिरे पवित्र झाले. बडगुजर नंतर अपूर्व हिरे बडे प्रस्थ. शिवाय हिरे परिवाराचे नाशिक जिल्ह्यात मोठे नेटवर्क.(हिरे परिवारावर पोलीस ठाण्यात तब्बल 30 पेक्षा अधिक गुन्हे आहेत) अकलूजचे मोहिते पाटील परिवारास संकटमोचक महाजनांनीच भाजपात आणले होते. ही पार्श्‍वभूमी पाहता भाजपात येणारी पुढची बडी असामी  कोण असू शकेल, याविषयी अटकळ बांधली जात आहे. मार्केट कमिटीच्या निवडणुका आणि  सभापतीची निवड फडणवीसांच्या मार्गदर्शनाखालीच झाल्याचा दावा केला जातो. फडणवीसांची कंडिशनच होती म्हणे, समूळ भाजपात येणार असाल तरच?
    आषाढी वारीतच (चंद्रभागेला) भाजपात मोठी भरती म्हणजे मोठी पुण्याई. अशी पर्वणी म्हणजे सोलापुरातही विरोधकांचा सुफडा साफ होणार की काय? म्हणून गिरीश महाजनांच्या दौर्‍यात काय काय घडामोडी, याकडे कार्यकर्त्यांचेच बारिक लक्ष्य.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow