पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा नेता दादांनी फोडला
जे भाजपाने केले, ते अजीतदादा करणार, निष्ठावंत "भाजपाई"वर लक्ष्य, महायुतीत फोडाफोडी मविआच्या पथ्यावर?

(विजयकुमार पिसे)
गेल्या तीन महिन्यात भाजपाने अजीतदादाचे काही नेते फोडले. जिथे दादांची ताकद आहे, तिथे त्यांच्या अडचणीत भर टाकत तगड्या नेत्यांना भाजपात घेतले. भाजपाची ही खेळी अजीतदादा देखील करणार आहेत. त्याची सुरुवात.. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा नेता फोडला आहे. भाजपात इनकमिंगमुळे निष्ठावंत अस्वस्थ आहेतच, असे नेते "आऊट"गोईंग झाले तर आश्चर्य वाटू नये. अशी गळतीची शक्यता आहे. कारण आता निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या.
दादांच्या बारामती विधानसभा मतदारसंघाचे भाजपा प्रभारी जालिंदर कामठे भाजपात उपेक्षित ठरल्यामुळे परतीचे वेध लागले आहेत. दादांचे लक्ष्य पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, नगरपालिका तसेच पुणे (ग्रामीण) जिल्हा परिषद.
भोरचे माजी आ.संग्राम थोपटे यांना भाजपात घेऊन तिथे दादा गटाचे आ. शंकर मांडेकर यांची कोंडी केली आहे. इंदापूरमध्ये कृषिमंत्री दत्ता भरणेन्समोर प्रवीण माने यांना आणले आहे. पुरंदरमध्ये काँग्रेसचे माजी आ. संजय जगताप देखील भाजपावासी झाले आहेत. हे तीनही विधानसभा बारामती लोकसभा मतदारसंघातील. अजीतदादांचे होम पीच. ही स्थिती राहिली, जिल्हा परिषद भाजपाने बळकावली तर दादांची पकड सैल होईल. त्यामुळे त्यांनीही कुरघोडी करत पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याच्या हातात घड्याळ बांधण्याची खेळी केली आहे.
गत विधानसभा निवडणुकीत पुरंदरमध्ये तीन नंबरवर गेलेले कामठे राष्ट्रवादीत आले तर दादांची ताकद निश्चित वाढणार आहे. कामठे मूळचे शरद पवारांचे निकटवर्तीय. 1999 मध्ये पुणे जिल्हा परिषदेतील 55 पैकी 53 एक गठ्ठा सदस्य राष्ट्रवादीत आणण्यात जालिंदर कामठे फत्ते ठरले. जि.प. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची खुर्चीही पटकावली. कामठे यांची ताकद पुरंदर तालुका आणि पुण्यातील कोंढवा परिसरात आहे. कामठेंप्रमाणे दुखावलेल्या भाजपाईंना "आऊट" गोईंग बळ मिळणार आहे.
What's Your Reaction?






