(विजयकुमार पिसे)
भाजपात बंडखोरीचा उद्रेक होईल, या आशाळभूत नजरेने भाजपाच्या नाराजांवर शिंदेसेना, अजीदादांचा गट लक्ष्य ठेवून आहे. 102 जागा लढण्यासाठी उसने अवसान आणून शिंदेसेना भाजपाशी बारर्गेनिंग पॉवर वाढवत आहे. तर अजीतदादा गट भाजपा आणि त्यांच्या काकावर दबाव आणत आहेत. काकापेक्षा पुतण्या वरचढ आहेच. पण त्यांच्या वरचढण्यात खाली भाजपाच्या कमळाची दांडी हे बहुदा विसरलेत. तर शिंदेेसेनेने अचानकपणे सोलापुरात सर्वे सुरू करून भाजपातील नाराज कोण, याचा शोध घेत आहेत. नव्हे तर काहीजणांना खर्चापाण्याची सोय करू, पण उमेदवारी घ्या म्हणून रेडकार्पेट घालत आहेत. नगर पालिका निवडणुकीत 57 नगराध्यक्ष राज्यभरात निवडून आल्यामुळे त्यांना हत्तीचे बळ आले आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपापेक्षा अधिक नगराध्यक्ष निवडून आले. हे देखील एक कारण.
अजीतदादा गटाचेही असेच उसने अवसान. अण्णो,मामा जोडीने जोर बैठक़ा सुरू केल्या. पण अण्णांना तिकडे पिंपरी चिंचवडात दमछाक करायचीय. यामुळे आता मामावर सारी मदार. मामांनी प्र.22,5 अशा काही हक्काच्या प्रभागात विश्वासाने विकास कामांची *कोटी केली. पण काही भाच्यांनी ऐनेवेळी दगा दिला. रातोरात किसनराव आणि नागेशअण्णांनी कमळ हातात घेतले. त्यामुळे सावध मामांनी काकांच्याच पक्षावर जाळे टाकले. त्यांच्याकडील दोन माजी महापौर पळवले. 75 पार नारा देणार्या दादा गटाचे येत्या तीन दिवसात 75 पार होतील. पण हा सारा खेळ रेडिमेड रेडकार्पेटवरच चालणार. त्यांच्यासाठी ही लॉटरीच.