शेळगीत भाजपाच चलनी नाणे
पाटलांची पाटीलकी,कार्यकर्ता कणकेंच्या विश्वासार्हतेवर पुन्हा मोहोर
2012 पासून शेळगी परिसर कायमच भाजपाच्या पाठिशी राहण्याची परंपरा यंदाही कायम राखली. यावेळी भाजपासमोर दुहेरी आव्हान होते. रवींद्र (रवी बॉस)गायकवाड जे गतवेळी भाजपाकडून लढून विजयी झाले,त्यांनी यावेळी अनपेक्षितपणे वंचितचा हात धरला. तसेच शेळगीमधील प्रतिष्ठित बिराजदार परिवार यांनीही अभी नही तो कभी नही, या भूमिकेतून अपक्ष पॅनलसह जोर लावला. तरीही भाजपा हेच विकासाचे चलनी नाणे खरे ठरले.
हरेक निवडणुकीत अविनाश पाटील परिवाराविषयी अॅन्टी इन्कम्बन्सी निर्माण केली जाते. उमेदवारीला विरोध इथंपर्यंत हे वातावरण असते. प्रत्यक्ष निवडणूक प्रचार सुरू होतो, तेव्हा शेळगीच्या पाटलांची पाटीलकी कायम राहते, हा अनुभव. त्यामुळे बिराजदार परिवाराची संपूर्ण शक्ती कामी आली नाही. शेळगी परिसरातील यशाचे आणखी एक गमक म्हणजे संजय कणके. प्रभागातील समस्या सोडवणुकीसाठी कार्यकर्ता म्हणून कणके 24 तास हजर. 2012 मध्ये राजश्री कणके शिवसेनेच्या तिकिटावर जिंकल्या. 2017मध्ये हा प्रभाग भाजपामय करण्यासाठी कणके यांनाच भाजपाकडून उमेदवारी देण्याचा आमचा प्रस्ताव पक्षाने मान्य केला. तो यावेळीही कायम राहिला. पाटील आणि कणके जोडी पुन्हा सुपरहिट्ट ठरली.
रवींद्र गायकवाड पूर्वाश्रमीचे आरपीआयचे. 2012 मध्ये ते विजयी झाले. त्यांनाही 2017 मध्ये भाजपाकडूनच उमेदवारी द्यावी, हा प्रस्ताव कामी आला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी वंचितचा हात धरला. त्यामुळे या संवेदनशील परिसरात राखीव जागेवर उमेदवारीचा पेच होता. राजाभाउ सरवदे यांचे पुत्र आणि पुतणे तसेच अजीत गादेकर येथून इच्छुक होते. गौतम कसबे यांना अखेर तिकीट मिळाले. तसेच माजी नगरसेवक प्रभाकर काशीद यांच्या पत्नी पूनम यांना संधी दिली.
भाजपासमोर वंचितचे कडवे आव्हान. शिवाय भाजपाची पारंपरिक मते बिराजदार आणि गादेकरांचे बंडखोर अपक्ष पॅनल खाणार ही भीती. बबलू गायकवाड, रमेश व्हटकर, नंदा कांगरे, सिध्दाराम आनंदकर, अमरनाथ बिराजदार,अजीत गादेकर अशी तगडी मंडळी भाजपाविरोधात होती. बसपा,शिंदे सेना,एनसीपी/ए, एनसीपी/एस,उबाठा,काँग्रेस यांच्या उमेदवारीमुळे मतविभागणीही अटळ ठरली. आणि शेवटी शेळगीत पुन्हा भाजपा चलनी नाणे ठरले. या प्रभागातील मंत्री चंडक,वर्धमान नगर,रूपाभवानी येथील उच्चशिक्षित वर्ग, माहेश्वरी समाज नेहमीच भाजपासोबत असतो. येथून उमेदवारी मागितली, ती नाराजी दूर करण्याचे आश्वासन पक्षाने दिले, स्वीकृतच्या रूपानेे दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी आता नेत्यांची आहे. निवडणुकीनंतर अशा अनेक शब्दांना हरताळ फासला जातो, हा अनुभव आहेच. पारंपारिक मतदार,समाज, वर्ग यांची दखल घेत सोशल इंजिनिअरिंग केले तर भाजपावरचा अटल विश्वास टिकून राहील. हेच भाजपाचे चलनी नाणे.
What's Your Reaction?





