पूर्वीच्याच कारभारींवर मतदारांचा विश्‍वास

काँग्रेस पतन इथूनच सुरू, निवडणूकही एकतर्फीच

Jan 22, 2026 - 00:19
 0  708
पूर्वीच्याच कारभारींवर मतदारांचा विश्‍वास

(विजयकुमार पिसे)
महाविकास आघाडीत काँग्रेस झाकोळून गेली, समोर एकही सेना सक्षमपणे लढली नाही, परिणामी पूर्वीच्याच कारभारींवर मतदारांनी विश्‍वास टाकला आणि  शेळगी, दहिटणे, मार्केट यार्ड, रविवार पेठ अणि जोशी गल्ली या प्रभाग 2 ची निवडणूक़ एकतर्फीच ठरली. गतवेळी या प्रभागात काँग्रेसचे माजी सभापती केदारनाथ  उंबरजे पूर्ण ताकदीने उभे होते, यंदा तेच भाजपासोबत राहिले, याचाही परिणाम या निवडणुकीत दिसला. या प्रभागात नेहमीच काँग्रेसचा जोर राहिला. यावेळी काँग्रेसने उमेदवारच दिला नाही, अर्थात काँग्रेस पतनाची सुरवात याच प्रभागातून झाली. प्रभाग क्र.2 आणि शेवटी काँग्रेसनेही संपूर्ण शहरात दोनच जागा जिंकून फुलस्टॉप घेतला.
   2002 च्या निवडणुकीत चाकोते,उंबरजे असे तगडे उमेदवार येथून प्रतिनिधित्व केले होते. नंतर चाकोतेंनी शेळगी सोडली. चंद्रकांत रमणशेट्टी आणि कल्पना कारभारी यांनी 2012 पासून या परिसरात भाजपाचा झेंडा रोवला, तो सलग तिसर्‍यांदा कायम राहिला. गतवेळी डॉ.किरण देशमुख या प्रभागात आले, उंबरजे/देशमुख लढत आरपार ठरली. 2017 चा अनुभव लक्षात घेता उंबरजे यांची माघार, आणि रमणशेट्टी यांनी जपलेली पक्षनिष्ठा, यामुळे चुरस संपली. शेळगी परिसरातील सगळीच प्रतिष्ठित मंडळी भाजपाच्या झेंड्याखाली आली, याचा परिणाम म्हणजे विक्रमी मताधिक्क्याने प्रा.नारायण बनसोडे,कल्पना कारभारी,शालन शिंदे आणि डॉ.किरण देशमुख विजयी झाले.
या प्रभागात निवडणुकी दरम्यान एक दुर्घटना घडली. जोशी गल्ली परिसरात  दोन गटात हाणामारीचा प्रसंग एक़ाच्या जीवावर बेतला. सरवदे या अन्य इच्छुक उमेदवाराची या हाणामारीत हत्या झाली. त्यामुळे भाजपा उमेदवार शालन शिंदे यांना तुरुंगातूनच निवडणूक़ लढवावी लागली. तरीही शालन शिंदे यांना 6700 इतके मताधिक्क्य मिळाले. दहिटणेचे उच्च विद्याविभूषित प्रा.नारायण बनसोडे यांना पुन्हा संधी नाही, अशी चर्चा होती. प्रा.बनसोडे यांना देखील ग्यारंटी नव्हती. आ.विजयकुमार देशमुख प्रारंभीपासूनच सांगत होते, कार्यकर्त्यांनाच संधी मिळणार, तो शब्द खरा ठरला. कल्पना कारभारी यांचे पती ज्ञानेश्‍वर कारभारी हे या प्रभागाचे खरे *कारभारी. जनसेवेसाठी कायम उपलब्ध, त्यामुळे हितचिंतक मतदारही समाधानी होते. दुसरे उच्च विद्याविभूषित डॉ.किरण देशमुख आमदारपुत्र असूनही गत पाच वर्षे नगरसेवक म्हणून *बडेजाव ठेवला नाही. विकास कामात दक्ष आणि प्रभागात संपर्क, सहवास कायम राहिला. त्यामुळे मतदारांचाही विश्‍वास वाढला. या प्रभागाचा भौगोलिक विस्तार मोठा तरीही विकास कामामध्ये नगरसेवकांनी हात आखडता घेतला नाही. त्यामुळे विरोधकांचा निभाव लागला नाही.
   उबाठाचे प्रशांत कावळे यांना 3274,मनसेच्या संध्या भोसले 4130,शिंदे सेनेच्या आफरिन पठाण यांना 4070 आणि गणेश कुलकर्णी यांना 3065 मते यांना जेमतेम 25 ते 30 टक्के इतकीच मिळाली. संपूर्ण प्रभागात *नोटा मतांची  संख्या *2642 आहे. सक्षम विरोधक उभे न राहिल्यामुळे मतदारांचाही नाईलाज झाला असावा, त्यामुळे त्यांनी मोठ्या संख्येने नोटा बटन दाबून नाराजी व्यक्त केली असे मानता येईल. बाकी जिंकलेले उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांचा पल्ला खूप मोठा राहिला. अजीत सेना, अपक्ष यांची मजल तर खूपच मागे राहिली. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या प्रभागामध्ये अर्थात विरोधक औषधाला देखील नव्हता अशी ही निवडणूक़ कदाचित या भागात पहिल्यांदा झाली असेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow