संघटनपर्व आणि संघटनमंत्री

येत्या 7 जुलै रोजी स्व. शरदभाऊ कुलकर्णी यांचा जन्मदिवस. संघटनेसाठी समर्पित शरदभाऊ भाजपाचे संघटनमंत्री होते. राजकारणात संघटनेचे काम दुय्यम मानले जाण्याच्या काळातही त्यांनी कुठल्याही कारणाने संघटना मागच्या स्थानावर जाणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळे संघटनेत संघटनमंत्र्यांचे महत्व अधोरेखित होते. पण अलीकडच्या काळात हे पद उपेक्षित राहिले आहे. त्यामुळे संघटनमंत्री रवींद्र भुसारी व विजयराव पुराणिक यांना अनपेक्षितपणे दायित्वमुक्त व्हावे लागले. आज भाजपा सत्तेच्या शीर्षस्थानी असूनही हे चित्र अस्वस्थ करणारे आहे.

Jul 3, 2025 - 18:15
Jul 3, 2025 - 18:21
 0  129
संघटनपर्व आणि संघटनमंत्री

 विजयकुमार पिसे 

रवींद्र चव्हाण यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. या दरम्यान 6 महिन्यापूर्वी जानेवारीत त्यांची प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्याबरोबरच संघटनपर्वास प्रारंभ झाला. विभागीय स्तरावर बैठका, कार्यशाळा पार पडल्या. मंडल, शहर आणि ग्रामीण स्तरापर्यंत संघटनपर्व अंतर्गत बूथ सशक्तीकरण, सदस्यता अभियान, सक्रिय सदस्य नोंदणी याकडे जातीने लक्ष दिले. आणि भाजपा सदसत्व लक्ष्य दीड कोटीपर्यंत पार केले. हा सारा प्रवास संघटनपर्व म्हणून निश्चितच अभिमानास्पद आहे. रवींद्र चव्हाण अध्यक्ष म्हणून आता कारभार पाहतील, तेव्हा गेल्या सहा महिन्यातील संघटनात्मक ढाँचा कसा याचा त्यांना निश्‍चितच जवळून अभ्यास झाला असेल. आता त्यांना सोबतची टीम देखील तयार करावी लागेल. संघटनपर्वचे महत्व लक्षात घेता टीम चव्हाणमध्ये संघटनमंत्री असणार की नाही. असेल तर त्याचे स्थान, महत्व आणि गरिमा राखता येईल?

    2014 पासून भाजपाची उत्तरोत्तर वाटचाल सत्तेच्या आणि प्रगतीच्या दिशेनेच आहे. रवींद्र चव्हाण यांच्या पदग्रहण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या निर्विवाद यशाचे महत्व अधोरेखित केले. मतदारांनी भरभरून मते दिली, हे खरे आहे. पण त्यामागे कार्यकर्ते आणि संघटनेचे परिश्रम देखील तितकेच आहे. भाजपात वारसाहक्काने पद मिळत नाही. सामान्य कार्यकर्ताच शीर्षस्थानी असतो, हे नीतीन गडकरी यांनीही आवर्जून सांगितले. त्यामुळे कार्यकर्ता आणि संघटन याचे महत्व निर्विवाद आहे. ही वस्तुस्थिती असताना गत दशकभरात संघटनेत संघटनमंत्री या पदाचे महत्व किती राहिले. होते. आणि आहे? हे अनुत्तरीत आहे. 

     रवींद्र भुसारी आणि विजयराव पुराणिक या दोन संघटनमंत्र्यांची उपेक्षा झाली. 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भुसारी प्रदेश संघटनमंत्री होते. याकाळात देशात नरेंद्र,राज्यात देवेंद्र ही टॅगलाईन प्रभावी ठरली. आता या टॅगलाईनमध्ये रवींद्र हे नावदेखील जोडले गेले आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर 2017 मध्ये अनपेक्षितपणे भुसारी संघटनमंत्री पदातून मुक्त झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी राजकीय क्षेत्रातून निवृत्ती घेतली आणि आपल्या जन्मभूमीत (ब्रह्मपुरी) सेवाकार्य उभे केले. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट हे अभिप्रेत नसलेले रवीजी आधी संघटन मग सत्ता व सरकार हे कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवत. त्यांच्यानंतर विजयराव पुराणिक प्रदेश संघटनमंत्री नियुक्त झाले. श्री भुसारी संघाचे प्रचारक होते. तसेच श्री पुराणिक भाजपात दायित्व घेण्यापूर्वी पश्‍चिम क्षेत्राचे (गुजरात, महाराष्ट्र, गोवा) प्रचारक होते. त्यांच्या (2019) कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही पक्षाने जिंकल्या. या दोन संघटमंत्र्यांविषयी संघटनेत (पक्ष) आणि सरकारात (सत्ता) कटुता निर्माण झाली, असे म्हटले जाते. त्यामुळे भुसारी व पुराणिक अनपेक्षितपणे पदमुक्त झाले, अशी चर्चा पक्षात होती. (पुराणिक पदमुक्त झाल्यानंतर श्रीकांत भारतीय संघटमंत्री झाले. श्रीकांतजी हे सत्तेच्या वर्तुळातील व्यक्तिमत्व). भुसारी व पुराणिक या दोन संघटनमंत्र्यांच्या बाबतीत जे घडले, याचा अर्थ सत्ता मिळताच नेतृत्व, संघटनेला/पक्षाला दुय्यम मानतो की काय? असा समज कार्यकर्त्यांत निर्माण होतो. भाजपात स्व.वसंतराव भागवत, स्व.शरदभाऊ कुलकर्णी अशा कुशल संघटनमंत्र्यांची परंपरा आहे. त्या फळीतील संघटनमंत्री श्री भुसारी आणि श्री पुराणिक देखील होते.

       2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्व. शरदभाऊंविषयी म्हटलंय...कामाचा पूर्व व पूर्ण विचार. तपशीलवार आखणी, बिनचूक अंमलबजावणी हा मा. शरदजींचा सहजस्वभाव होता. हा स्वभाव संघटनेत रुजावा, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. राजकारणात संघटनेचे काम दुय्यम मानले जाण्याच्या काळातही त्यांनी कुठल्याही कारणाने संघटना मागच्या स्थानावर जाणार नाही, याची काळजी घेतली. (7 जुलै शरदभाऊंचा जन्मदिवस. त्यांना जाऊन आज 21 वर्षं झाली.)

      देवेंद्र फडणवीस यांनी शरदभाऊंविषयी व्यक्त केलेले मनोगत आणि आज संघटनेत संघटनमंत्रीपद नसणे हे दुर्दैव आहे. पक्षात इनकमिंग झालेले आणि पदासाठीच आग्रही असणारे नेते व कार्यकर्ते यापैकी कितीजणांना संघातून प्रचारक म्हणून पक्ष संघटनेत समर्पण भावनेतून संघटमंत्रीपदाची यशस्वी धुरा वाहिली, असे समर्पित स्व.वसंतराव भागवत, स्व. शरदभाऊ कुलकर्णी, रवींद्र भुसारी, विजयराव पुराणिक माहीत आहेत? आधी संघटन मग सत्ता. संघटन मे शक्ती है, असे म्हटले जाते. त्यामागे त्याग आणि समर्पण भाव अतूट आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow