भाजपाचा बी प्लॅन तयार?अर्ज नाही,मुलाखत नाही, तरीही मिळेल उमेदवारी!
निष्ठावंत अस्वस्थ,३५२ इच्छुकांच्या मुलाखती,यानंतरही होतील इनकमिंग,त्या सर्वेची फक्त चर्चा
(विजयकुमार पिसे)
तब्बल 844 विक्रमी अर्ज दाखल झालेल्या बीग बी भाजपाने सोलापूर महापालिकेसाठी मंगळवारी 352 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. बुधवारी प्र.11 ते 20 साठी मुलाखतींचा दुसरा टप्पा सुरू होत असून कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला असता भाजपाचा बी प्लॅन तयार आहे? ज्यांचा अर्ज नाही, मुलाखत दिली नाही, तरीही त्यांना तिकीट मिळेल, असा शब्द इनकमिंगना दिला गेला अशी कुजबूज आहे. त्यामुळे निष्ठावंत अस्वस्थ झाले आहेत. भाजपाचा बी प्लॅनचा दुसरा पार्ट असा आहे की, ज्यांना तिकीटे दिली जाणार नाहीत, अशांना बंड करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार नाही.जेणेकरून बंडोबा थंड होतील.
'गल्ली ते दिल्ली, ओन्ली कमल' असा माहोल असल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना आता संधी मिळेल, पक्षासाठी खस्ता खाल्लेले दिवस विसरून आपण देखील नगरसेवक होऊ, असे स्वप्न उराशी बाळगलेल्या कार्यकर्त्यांचा स्वप्नभंग होणार तर नाही ना? हा खरा सवाल आहे. मंगळवारी सकाळी 9 पासून सोलापूर शहर भाजपा कार्यालयात मुलाखतींना प्रारंभ झाला. इच्छुकांची विक्रमी संख्या आणि मुलाखतींसाठी प्रचंड गर्दी असतानाही सायंकाळी मुलाखती लवकर संपल्या, याचे अनेकांना आश्चर्य वाटले. मुलाखती घेणार्या पदाधिकार्यांनी केवळ सोपस्कार पार पाडले? किंवा नेमके कोणते प्रश्न विचारले पाहिजेत याचा या मंडळींना अभ्यास नसावा, अशी प्रतिक्रिया मुलाखती दिलेल्या इच्छुकांनी दिली. त्यामुळे मुलाखती केवळ सोपस्कार असावेत, पक्षाचा बी प्लॅन तयार असावा, अशी कुजबूज सुरू आहे. यासाठी आधार/कारण म्हणजे गत विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी निरीक्षक पाठवून मतदानाची प्रक्रिया पार पडली, पण प्रत्यक्षात झाले वेगळेच.
अन्य पक्षातून अजूनही काही मंडळी भाजपात येण्यास उत्सुक आहेत,पण त्यांना तिकीट हवे, आणि हा शब्द नेत्यांनी दिला, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. त्यामुळे अर्ज नसला तरी,मुलाखत नाही दिली,तरीही आम्हाला घरबसल्या तिकीट मिळेल. किंवा अर्ज दाखल केल्याचे कागदोपत्री नोंद केली जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स म्हणजे असाच सारा मामला असतो, ह्याचा बोलबाला सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा बी फार्म मिळेल, तेव्हा कुठे गडबड झाली, याचा उलगडा होईलच.
सर्वेची फक्त चर्चा...
मुलाखतीप्रसंगी तुमच्या प्रभागात वरून सर्वे सुरू आहे, तुमचे नाव सर्वेमध्ये दिसले पाहिजे. असे कौशल्य तुम्ही दाखवा, असे इच्छुकांना पदाधिकार्यांनी सांगितले. सर्वे म्हणजे निव्वळ धूळफेक असावी, असेही काही कार्यकर्त्यांचे मुलाखतीनंतर मत दिसून आले.
प्रभागनिहाय झालेल्या मुलाखती अशा..
प्रभाग क्र.1/40, प्र.2/25, प्र.3/64, प्र.4/37/, प्र.5/30, प्र.6/27 पैकी21. प्र.7/31पैकी 21, प्र.8/50पैकी41, प्र.9/70 पैकी 52, प्र.10/34पैकी19.
What's Your Reaction?