ग्रामदैवत सिध्दरामेश्‍वर यात्रेत खोडा,निवडणूक़ आयोगाचा डाव

1930 मध्ये मार्शल लॉ काळात ब्रिटिशांकडूनही असा निंद्य प्रकार

Dec 17, 2025 - 11:26
Dec 17, 2025 - 11:29
 0  181
ग्रामदैवत सिध्दरामेश्‍वर यात्रेत खोडा,निवडणूक़ आयोगाचा डाव

(विजयकुमार पिसे)
    निवडणूक आयोगाच्या मनमानीविषयी सुप्रीम कोर्टाने अनेकदा तंबी दिली आहे. खडे बोल सुनावले आहेत. नगरपालिका निवडणुकीत झालेले घोटाळे अगदी ताजे आहेत. आता महापालिका निवडणुकीतही असाच खेळखंडोबा निवडणूक आायोगाने केला असून सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्‍वर यात्रा काळातच निवडणुकीचा राडा घातला आहे. ब्रिटिश अंमलाच्या 1930 मार्शल लॉ काळानंतर असा प्रकार होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान सिध्देश्‍वर यात्रेचे मानकरी आ.विजयकुमार देशमुख आणि देवस्थानचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी प्रशासनाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. 
     सिध्दरामेश्‍वरांची गड्डा यात्रा परंपरेप्रमाणे 11 जानेवारीपासून 15 जानेवारीपयर्र्त असते. काल निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. ज्या दिवशी गड्डा यात्रेचा समारोप नंदीध्वज मिरवणूक व शोभेच्या दारूकामाने होते, त्याच दिवशी महापालिकेसाठी मतदान आहे. ही बाब सोलापूर मनपा आयुक्त, जिल्हा आणि पोलीस प्रशासन यांनी  निवडणूक़ आयोगाच्या निदर्शनास आणली नाही का? कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्‍न असतो. याविषयी निवडणूक आयोगाला गांभीर्य नसावे. त्यामुळे भाविकांच्या श्रध्देला ठेच पोहोचवण्याचा निवडणूक आयोगाचा प्रकार हा मनमानीचा आहे. 31 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया संपवण्याच्या धांदात स्थानिक परिस्थिती, यात्रा व धार्मिक कार्यक्रम याची माहिती आयोगाला नसावी, हे इतके हलक्यातच घेतले गेले आहे. त्यामुळे काल सोमवारी निवडणूक़ आयोगाची घोषणा होताच भाजपा आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्थानिक प्रशासनाने यात्रेविषयी निवडणूक़ आयोगाला अवगत केले नसावे, त्यामुळे प्रचार कसा करणार, कार्यकर्ते काम कसे करणार आणि मतदानावरही परिणाम होणार, अशी भीती त्यांनी उपस्थित केली होती.

      समस्त सोलापूरकर आणि आंध्र. व कर्नाटकातील भाविकांच्या श्रध्देची ही गड्डा यात्रा, परंपरेने आणि अखंडपणे सुरू आहे. चार वर्षापूर्वी करोना काळात सोशल डिस्टन्स पाळत प्रथा व परंपरेला बाधा न येता यात्रा निर्विघ्नपणे पार पाडली. 1930 मध्ये सोलापुरात ब्रिटिश अंमलचा मार्शल लॉ होता. तेव्हा यात्रेच्या कालावधीतच ब्रिटिशांनी या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी केली आणि चार हुतात्मे यांना फाशी दिली. हा प्रकार जखमेवर मीठ चोळणारा होता.
    आता निवडणूक आयोग यात्रा काळातच निवडणूक प्रक्रिया सुरू करून यात्रेत खोडा घालत असल्याची भाविकांची भावना आहे. याबाबत यात्रेचे मानकरी राजशेखर हब्बू यांनी प्रशासनाकडे निवेदन देखील दिले आहे. त्यामुळे समस्त सोलापूरकरांनीही निवडणूक आयोगाकडे आवाज उठवण्याची आवश्यकता आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow