काँग्रेसला (राहू)ल काळ, अजूनही थांबेना गळती!
अ.भा.युवक अध्यक्ष स्व.राजीव सातवांच्या पत्नी आ. प्रज्ञाताई भाजपात
(विजयकुमार पिसे)
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. राजीव सातव यांच्या पत्नी आ.प्रज्ञा सातव यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी त्यांचा अधिकृत प्रवेश होईल. प्रज्ञा सातव या विधान परिषदेच्या काँग्रेस सदस्या आहेत.
लोकसभा, विधानसभा झाल्या, आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुरू आहेत, पण काँग्रेस उभारी घेत नाही. राहु(ल) काल संपलेला दिसत नाही.
हिंगोली लोकसभेतून राजीव सातव मोदी लाटेतही 2014 मध्ये विजयी झाले होते. राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख. कोरोनात त्यांचे अकाली निधन झाले. सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी दिली. सातव कुटुंब पूर्वीपासून गांधी परिवाराशी काँग्रेसशी एकनिष्ठ. त्यांच्या मातोश्री श्रीमती रजनी सातव या प्रदेश काँग्रेस अध्यक्षा देखील होत्या. त्यांच्यानंतर राजीव सातव ही पुढची पिढी काँग्रेस आणि गांधी परिवाराशी निकटवर्तीय म्हणून परिचित. विधान परिषदेच्या आ. प्रज्ञा सातव सध्या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षा आहेत. शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त जागी 2021 मध्ये बिनविरोध निवडून आल्या. 2024 मध्ये त्या दुसर्यांदा विधान परिषदेवर पक्षाने पुन्हा संधी दिली.
महाराष्ट्रात 2014 मध्ये काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, त्यात राजीव सातव होते. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय युवक अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदार्या सांभाळल्या होत्या.
What's Your Reaction?