दक्षिण सोलापुरात पुन्हा विधानसभा पॅटर्न,पण तिकिटाची काय गॅरंटी
इनकमिंगसाठी काही असामींचा मुंबईत तर प्रभारी रघुनाथजींचा सोलापुरात तळ, आज प्राईम लोेकेशन प्र.24 च्या मुलाखतीसाठी अनेक नामचीन येणार?
(विजयकुमार पिसे)
गत विधानसभा निवडणुकीत अनेक माध्यमांनी दवा देणारा *वैद्य इम्पोर्ट केला होता. वर्ष झालं तो वैद्य कुठे गायब केला की झाला सापडत नाही. वैद्यांनी मतदारसंघाचं व्हिजन असा काही मांडला की माध्यमातील मंडळी हरखून गेली. आता महापालिका निवडणुकीसाठी अशाच विधानसभा पॅटर्नचा शोध जारी आहे. बहुदा तो प्रभाग 24 मध्येच असावा? पण जसं त्या *वैद्यांचं झालं. आता देखील तिकिटाची काय *गॅरंटी? आज दक्षिण सोलापूर मतदारसंघातील प्र.21 ते 26 साठी इच्छुकांच्या मुलाखती होत आहेत. यामध्ये अनेक नामचीन नेते व कार्यकर्ते मंडळी आहेत. पण यापैकी काहींचे लक्ष मुंबईकडे आहे म्हणे. तिकडे इनकमिंग होईल आणि इथे आमचं भाग्य फळफळेल. याशिवाय शहरातील अन्य इच्छुकांनीही मुलाखतींऐवजी मुंबईकडे कूच केली, अशीही चर्चा आहे. हे अन्य इच्छुक कोण? पण निवडणूक प्रभारी रघुनाथ कुलकर्णी सोलापुरात तळ ठोकून आहेत, त्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते सुखावले आहेत.
गेले दोन दिवस संपूर्ण शहर उत्तर आणि मध्य तर दक्षिण सोलापुरातील काही प्रभागांच्या मुलाखती भाजपा कार्यालयात पार पडल्या.प्र.3,8,9,13,18,19 येथे इच्छुकांची संख्या मोठी आहे. या भागात भाजपा उमेदवार हमखास निवडून येतो, असा पूर्वापार अनुभव आहे. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे, शिवाय अनेक इनकमिंग संधी शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.
आज दक्षिण सोलापूर मतदारसंघातील प्रभाग 24 च्या इच्छुकांकडे अनेकांचे लक्ष आहे. जुळे सोलापूरच नव्हे तर सोलापूर शहराचे *प्राईम लोकेशन म्हणून या प्रभागाची ओळख आहे.
अनेक आजी, माजी आणि भावी सोशल मिडियावर झळकत आहेत. पण अनेकांची मदार *कुणी तरी येतंय म्हणून पुन्हा पुन्हा *पुड्या सोडत आहेत. पालकमंत्र्यांच्या खुलाशानंतर गेले दोन दिवसांपासून पैजा लावल्या आहेत. हा सारा खेळ मुंबईत होणार आणि वाजत गाजत सोलापुरात येणार, अशी अटकळ आहे. ही उत्सुकता आणि अस्वस्थता इच्छुक कार्यकर्त्यांची. पण भाजपाचे सर्वच आमदार निश्चिंत आहेत. कुणीही येवो! निवडणूक प्रभारी रघुनाथजी कुलकर्णी गेले दोन दिवस सोलापुरात तळ ठोकून आहेत. इथे मुलाखती कशा होताहेत, कोण घेताहेत, मुलाखती घेणारे जबाबदार पदाधिकारी किती जाणकार,निष्ठावंत, पक्ष, संघटना आणि विचारधारा विषयी त्यांचा किती अभ्यास आहे. कारण सध्या नवीन भाजपाची चर्चा आहे. नवीन भाजपात जुन्याची मोडतोड होणार नाही, याची काळजी शेवटी पक्ष संघटनेलाच आहे. त्यामुळे शेवटी तिथेही प्रश्न उरतोच तिकिटाची काय गॅरंटी?
What's Your Reaction?