आपल्या नेत्यासाठी दोघे जीवावर उठले; मस्साजोग पॅटर्नचा असाही धसका
त्या गाडीत आक्षेपार्ह साहित्यांमुळे पोलीसही चक्रावले, मस्साजोगमुळे बीड जिल्ह्याचा झाला बिहार, नेत्याने मंत्रिपद गमावले, पण इथे साहेबांचा नातू आणि कार्यकर्ते अजूनही फार्मात

(विजयकुमार पिसे)
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या अंगावर शहारे आणणारीच आहे. क्राईम पेट्रोलपेक्षाही भयानक असा प्रक़ार सोलापुरातही घडवून आणण्याचा घाट पवारांच्या लाडक्या कार्यकर्त्यांनी घातला खरा. पण नशिब या कार्यकर्त्याचे अन्यथा त्याचाही गेम ओव्हर झाला असता. पोलिसांनी तत्परता दाखवली नसती तर... पण सोलापुरातही "मस्साजोग" अटळ होता.
ह्या कथित भीषण कांडची पार्श्वभूमी आहे चार वर्षापूर्वीची. आ. गोपीचंद पडळकर यांनी 2021 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांवर टीका करताना "रात्र गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात", या भाषेत जहरी टीका केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचा पवार समर्थक कार्यकर्ता अमित सुरवसे याच्या जिव्हारी ही टीका लागली. या टीकेवरून अमित आणि शरणू हे दोन कार्यक़र्ते आपल्या नेत्यांना खूष करण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठले.
गेल्या गुरुवारी 7 ऑगस्ट रोजी आ.पडळकर समर्थक शरणू हांडेचे (वय 35)अक्कलकोट रोड समाधान नगर येथून अपहरण करण्यात आले. ही खबर मिळताच आरोपीच्या गाडीचा पाठलाग करत ही गाडी कर्नाटकातील विजयपूरजवळील होर्ती येथे पकडली, तेव्हा पकडलेल्या या गाडीत कंडोम, साडी, फटाक्यांची माळ, ट्रायपॉड सापडले. त्यामुळे आरोपी शरणू हांडे सोबत काय करणार होते या अंदाजाने पोलीसही चक्रावले आहेत. दरम्यान शरणू हांडे याचे अपहरण करून त्याच्या पायावर धारदार हत्याराने आरोपींनी वार केले असून जखमी हांडे यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्य आरोपी अमित म्हाळप्पा सुरवसे (वय 29, रा. मणिधारी सोसायटी, अक्कलकोट रोड), सह त्याचे साथीदार सुनील भीमाशंकर पुजारी (वय 20, रा. साईबाबा चौक), दीपक जयराम मेश्राम (वय 23, रा. लोकमंगल हॉस्पिटलजवळ, आशा नगर), अभिषेक गणेश माने (वय 23, रा. एकतानगर), राकेश भीमाशंकर कुदरे (वय 21, रा. मुमताज नगर), श्रीकांत बाबुराव सुरपुरे (वय 24, रा. सिध्दरामेश्वर नगर, एमआयडीसी) व समर्थ वासुदेव भैरी (वय 19, रा. नीलमनगर) यांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रशांत वाघमारे, विजय खोमणे हे करीत आहेत.
गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला उत्तर म्हणून त्यांच्या वाहनावर आ.रोहित पवारांचा कार्यकर्ता अमित सुरवसेने दगडफेक केली होती. त्याचे उट्टे चार वर्षांनी शरणू हांडे याने काढले. आपला नेता आ. गोपीचंद पडळकर यांना खुश करण्यासाठी मे 2025 मध्ये अमित सुरवसे याला शरणू हांडेने बेदम मारहाण करून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता.
पोलीस उशिरा पोहोचले असते तर...
सीसीटीव्ही फुटेजमुळे कारचा क्रमांक मिळाला, त्यावरून 4 तासांत आरोपींना गाठला आलेशरणू हांडे यांचे अपहरण करण्यासाठी संशयित आरोपींनी पुण्यातील एका खासगी टूर कंपनीची कार (क्र.एमएच 12 एक्सएक्स 6547) भाड्याने घेतली. 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हांडे यांचे अपहरण करण्यात आले. मात्र, कारला टूर कंपनीने जीपीएस ट्रॅकर आणि कंट्रोल सिस्टिम लावलेली होती. त्याच्या मदतीने पोलिसांनी कर्नाटक राज्याच्या हद्दीत इंजिन बंद करून कार रोखली. त्यांचा पाठलाग करणार्या सोलापूर शहर पोलिसांच्या पथकाने अपहृत हांडे यांची सुटका केली. तसेच चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले.अपहरण झाल्याच्या चार तासांत पोलिसांनी छडा लावला. यासाठी जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने पोलिसांनी सुमारे 65 किमी अंतरापर्यंत आरोपींच्या कारचा पाठलाग केला. कर्नाटक हद्दीतील होर्ती (जि. विजयपूर) येथे ताब्यात घेतले. पोलीस 5 ते 10 मिनिटे उशीरा पोहोचले असते तर शरणू हांडेचा गेम झाला असता.
What's Your Reaction?






