गोकुळ शुगरकडून उसाचे बिल थकीत; 28 वर्षीय तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

राजकारणी शिंदे, म्हेत्रे परिवाराच्या मालकीच्या कारखान्याकडून शेतकर्‍यांची हेळसांड, कर्ज वसुलीसाठी बँकेचाही तगादा

Aug 13, 2025 - 23:56
 0  118
गोकुळ शुगरकडून उसाचे बिल थकीत;  28 वर्षीय तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

(विजयकुमार पिसे)
दक्षिण सोलापूऱ तालुक्यातील गोकुळ शुगर कारखान्याने (धोत्री) अनेक शेतकर्‍यांच्या उसाचे  बिल थकवले असून कर्जबाजारी झालेल्या एका तरुण शेतकर्‍याने अखेर मृत्यूला कवटळाले. बिल थकीत आहे, बँकेचे कर्ज कसं फेडू, ही तरुण शेतकर्‍याची व्यथा होती. अक्कलकोट तालुक्यातील नागूर येथील कुंभार कुटुंबावर दु:खाचं आभाळ कोसळलं असून घरातील कर्ता मुलगा गमावला आहे. गोकुळ शुगर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिंदे (दहिटणे) आणि माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मालकीचा आहे. गत तीन वर्षांंपासून हा कारखाना बंद असून युनियन बँकेचे 28.57 कोटींचे कर्ज थकीत आहे. बँकेने  शिंदे आणि म्हेत्रे परिवाराची प्रॉपर्टी लिलावात काढली आहे.
   अक्कलकोट तालुक्यातील नागूर येथील सुनील कुंभार (वय 28)  असे या तरुण शेतकर्‍याचे नाव आहे. ऊसाचे थकीत बिल आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन केले होते. उपचारासाठी सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात  दाखल केले होते. चार दिवस सुनीलने मृत्यूशी झुंज दिली अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयातच हंबरडा फोडला. सुनील कुंभार यांच्या पश्‍चात वृद्ध आई-वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
  दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर यांच्याकडे उस घातल्यानंतरही बील थकवले गेले. दरम्यान मैंदर्गी येथील बँक ऑफ महाराष्ट्रने कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला. या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याने आत्महत्या केली. सुनील कुंभार हा घरचा कर्ता पुरुष होता. अखेर विष प्राशन केले, त्याने  चिट्टी लिहिली होती.उसाचे बिल थकीत आहे, कारखान्याने उसाचे बिल दिले नाही. बँकेचा हफ्ता थकलाय आणि ट्रॅक्टरचे कर्ज कसे फेडू असा मजकूर त्या चिटृठीत होता. घरातील कर्ता युवकच गेल्याने कुंभार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुनील आई-वडिलांना एकुलता मुलगा होता. आईला मानसिक आजार आहे. तर वार्धक्यामुळे वडील काम करू शकत नाहीत. त्यामुळे घरची जबाबदारी सुनीलवरच होती. दरम्यान या घटनेनंतर गोकुळ शुगरच्या अधिकार्‍यांनी शासकीय रुग्णालय येथे भेट घेऊन मदतीचे आश्‍वासन दिले. परंतु उसाचे बील न दिल्यामुळे कर्जबाजारी शेतकरी मृत्यूला कवटाळला त्याचे काय?  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow