...तर लोकशाहीची अंत्ययात्रा: प्रा.सुधीर गव्हाणे यांचे परखड मत
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते राजकारण आणि पत्रकारिता पुस्तकाचे प्रकाशन
सोलापूर : राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत आहे. पूर्वीच्या काळी राजकीय क्षेत्रात एखाद दुसराच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माणूस असायचा. आता ते प्रमाण वाढले आहे. पूर्वी जी वरिष्ठ सभागृहे बुद्धिवंतांसाठी ओळखली जायची तिथे आता जणू काही धनवानांसाठी आरक्षणच ठेवले आहे. आता निवृत्त अधिकारीही राजकारणात येऊ लागले आहेत. असे नेते, गुन्हेगार, धनवान व निवृत्त अधिकारी जर राजकारणात एकत्र आले तर लोकशाहीची अंत्ययात्रा निघायला वेळ लागणार नाही, असे परखड मत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले.
सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे निवृत्त प्रमुख प्रा.डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी लिहिलेल्या "राजकारण आणि पत्रकारिता" या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. निकोप लोकशाही निर्माण होण्यासाठी सर्वसामान्य माणसाची व पत्रकारांची भूमिका महत्त्वाची वाटते. राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी सर्वसामान्य माणसाने पुढे येण्याची गरज आहे. म्हणूनच डॉ. चिंचोलकर यांचे पुस्तक महत्त्वपूर्ण असून त्याचे हिंदी व इंग्रजीतही भाषांतर व्हावे, अशी अपेक्षाही प्रा. गव्हाणे यांनी व्यक्त केली.
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.राजकारण आणि पत्रकारिता हे पुस्तक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात उपलब्ध करून द्या, असे माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी या पुस्तकात राजकारण आणि पत्रकारिता क्षेत्राबाबत चांगले विश्लेषण केले आहे. विद्यार्थी तसेच राजकीय क्षेत्रातील लोकांनी ते आवर्जून वाचावे. विविध विद्यापीठांच्या अभ्यासकमासाठी ते निवडले जावे. पत्रकारिता कशी असावी, राजकारणात कोणते बदल घडायला हवेत यावरही पुस्तकात भाष्य केले आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्तच्या या कार्यक्रमास प्रा. श्रीकांत येळेगावकर, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलगुडे, विद्या बुक पब्लिकेशनचे शशिकांत पिंपळापुरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
What's Your Reaction?