इनकमिंगला विरोध,भाजपा आ.देवयानी फरांदे भावुक
नाशकात प्रवेशप्रसंगी राडा, महिलांची,ओबीसींची मुस्कटदाबी?
(विजयकुमार पिसे)
काँग्रेसमुक्तच्या नादात भाजपा काँग्रेसयुक्त, अशी सर्वत्र टीका होत असताना भाजपात इनकमिंग सुरूच आहे. आज नाशकात दोन गटात राडा झाला. संकटमोचक मंत्री गिरीश महाजन इनकमिंगवर ठाम राहिल्याने अखेर पोलीस बंदोबस्तात प्रवेशाचा सोहळा पार पडला. यासंदर्भात भाजपाच्या महिला आमदार प्रा.देवयानी फरांदे आपली भूमिका मांडताना अक्षरश: भावुक झाल्या. त्यांना गहिवरून आले. यापूर्वी ठाकरे सेनेचे वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला महिला आ.सीमा हिरे यांनीही प्रचंड विरोध केला होता. भाजपा महिला नेत्यांबाबतचा हा दुसरा अनुभव अस्वस्थ करणारा आहे.
आ.फरांदे यांनी सांगितले की, 40 वर्षे पक्षात काम करते,मी निष्ठावंत कार्यकर्ती आहे, माझ्यासाठी कधीच काही मागितले नाही. पण आज कार्यकर्त्यांचा बळी जाऊ नये म्हणून पुढे यावे लागले. या घटनेवरून नाशिकच नव्हे तर राज्यभरात इनकमिंगला प्रचंड विरोध, धरणे आंदोलन, निदर्शने,उपोषणानंतरही याची अजिबात दखल घेतली जात नाही. सोलापुरातही आंदोलन,निदर्शने, धरणे झाले. तरीही दिलीप माने व अन्य अनेकांना प्रवेश दिले गेले. विद्यमान आमदाराचीही मुस्कटदाबी केली जाते. जे नाशकात, तेच कदाचित अन्य शहरांमध्येही होत असले पाहिजे. आज स्व.अटलबिहारी वाजपेयींच्या जन्मदिनीच अशा निंद्य प्रकाराबद्दल चिंता देखील व्यक्त केली जात आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सकाळपासूनच सुरू होत्या. मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत मनसेचे दिनकर पाटील, ठाकरे गटाचे विनायक पांडे, यतीन वाघ यांचेसह सहाजणांचा आज भाजप प्रवेश झाला. यापैकी काही नेत्यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केला होता. पण त्यांचा विरोध झुगारुन या नेत्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे.
पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर भाजपच्या आ. देवयानी फरांदे यांना आपली भूमिका मांडताना त्या गहिवरल्या. आजचे पक्षप्रवेश झाले नसते तरी भाजपच जिंकलं असतं. ज्यांना मला कोंडीत पकडायचं आहे त्यांनी पकडावं, मी कुणाला घाबरत नाही. मी महाजनांवर नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं. पक्षप्रवेश झाल्यावर पक्ष मोठा होतो पण निष्ठावंतांवर अन्याय नको. कार्यकर्त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहायल हवं. ते वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करतात.
*फरांदे यांच्या डोळ्यांत अश्रू
गेली 40 वर्षे पक्षात काम करते. माझे सासरे (प्रा.ना.स.फरांदे) 1990 मध्ये प्रदेशाध्यक्ष होते, पती (प्रा.सुहास फरांदे) सहा वर्षे अध्यक्ष असताना सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. हा अनुभव सांगताना मी स्वत: माझ्यावर कधी अन्याय झाला असेल, पक्षाकडून कुठली भूमिका घेतली गेली असेल स्वत:साठी आजपर्यंत कधी जाहीर भूमिका घेतलेली नाही. पक्षाची मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. पण सर्वांनी नेते व्हायचं आणि सगळ्यांनी आपापलं बघायचं. मग पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कुणी पाठबळ द्यायचं? त्यामुळे मी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. एवढाच विषय होता, असं देवयानी फरांदे यांनी स्पष्ट केलं.
गहिवरुन येण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे मी अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे. माझ्या डोळ्यांसमोर कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर हे काही मला बरोबर वाटलं नाही. पण आज जे घडलं ते मला आवडलेलं नाही, असं म्हणत असताना देवयानी फरांदे यांना गहिवरुन आलं
What's Your Reaction?