राष्ट्रवादीवर भाजपाचा सर्जिकल स्ट्राईक
मतदानाला 48 तास आधीच उमेदवार तुषार जक्का भाजपाचा पक्का, प्र. 9 मध्ये दादांना धक्का, आणखी एक उमेदवार गळणार?
(विजयकुमार पिसे)
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे 48 तास उरले असताना राष्ट्रवादीवर भाजपाने सर्जिकल स्ट्राईक करून अजितदादांचा अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांना भाजपाचा पक्का केला. प्र.9 मध्ये झालेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर अन्य उमेदवारांवर अशी आफत येण्याची शक्यता वाढली असून विरोधकांमध्ये धाकधूक लागली आहे. दरम्यान उमेदवार सरेंडर होताना तुषार जक्कासाठी 25 लाखांचा डील करण्यात आला, असा आरोप होत आहे.
भाजप सर्व प्रभागात 102 उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांनी गेल्या महिन्यात सोलापूर दौर्यामध्ये 75 पार ची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात त्यांना 75 उमेदवार मिळाले नाहीत, शिवाय सेनेबरोबर युती केली. प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि मविआ अशी लढत आहे. राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे उमेदवार तुषार जक्का यांनी सोमवारी थेट भाजपात प्रवेश केला. आता त्यांचा पाठिंबाही मिळाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे घडयाळ बंद पडण्याची भीती आहे. शिवाय याच पक्षाचा आणखी एक़ उमेदवार भाजपाच्या गळाला लागेल, अशी चर्चा आहे.
सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आ.देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे तुषार जक्का यांनी जाहीररीत्या भाजपात प्रवेश केला. त्यामुळे अजितदादा गटाला धक्का बसला असून आणखी काही उमेदवार गळतील या भीतीने नेते सावध झाले आहेत.
दरम्यान राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी पालकमंत्री गोरे, आ.कोठे यांच्यावर 25 लाख रुपयांत राष्ट्रवादीचे जक्का यांना विकत घेतले, असा आरोप करून हा रडीचा डाव असल्याचे म्हटले आहे. येत्या 48 तासात अन्य पक्षाचे तसेच काही अपक्ष उमेदवार भाजपाच्या गळाला लागतील, अशी चर्चा असून उमेदवार कुठे लपवून ठेवायचे की गायब करायचे, यावर विरोधकांत चिंतन सुरू आहे.
What's Your Reaction?