लिंगराज वल्याळ, ज्यांनी सोलापुरात पहिल्यांदा कमळ फुलवले, यंदा मनपा निवडणुकीत वल्याळ विस्मरणात!
लिंगराज वल्याळ, ज्यांनी सोलापुरात पहिल्यांदा कमळ फुलवले, यंदा मनपा निवडणुकीत वल्याळ विस्मरणात!
(विजयकुमार पिसे)
संघ स्वयंसेवक, कार्यवाह अशा दायित्वातून पुढे काँग्रेसचा पराभव करून सोलापुरात पहिल्यांदा भाजपाचे कमळ फुलवले. नगरसेवक, दोन वेळा आमदार आणि खासदार म्हणून लिंगराज वल्याळ यांचे नाव सोलापूरकरांना परिचित असेल. यंदाची महापालिका निवडणूक वल्याळ यांच्या विस्मरणात पार पडतेय. भाजपाच्या 102 पैकी किती उमेदवारांना त्यांचे नाव माहीत असेल. असो.
1985 मध्ये काँग्रेसची सत्ता हटवून पुलोदचा प्रयोग झाला. तेव्हा भाजपाचे 11 नगरसेवक निवडून आले. त्या टीममध्ये वल्याळ होते. स्थायी समिती सभापती झाले. बाबुराव चाकोते काँग्रेसचे बलाढ्य नेते, विद्यमान आमदार. त्यांना पराभूत करून वल्याळ जायंट किलर ठरले.प. महाराष्ट्रातील भाजपचे एकमेव आमदार. सोलापुरात पहिल्यांदा भाजपाचे कमळ फुलले. 1995 मध्ये पुन्हा एकदा वल्याळ आमदार झाले. त्या विजयावरून बाळीवेसमध्ये विजय चौक नामकरण झाले. तिथे प्रमोद महाजन यांची निवडणूक प्रचाराची शेवटची सभा नेहमी व्हायची. आता तिथे विजय चौक नावालाच राहिला असेल. आणि वल्याळ यांचेही नाव विस्मरणात गेले.
महापालिका निवडणुकीत 2017 पर्यंत त्यांचे नाव माहीत होते. कारण प्र.9 मध्ये त्यांचे पुत्र नागेश वल्याळ निवडणूक रिंगणात होते. या पॅनलमध्ये भाजपाचे चार उमेदवार वल्याळ, अविनाश बोमड्याल, राधिका पोसा, आणि रामेश्वरी बिर्रू काँग्रेसचे बलाढ्य उमेदवारांना पराभूत करून विजयी झाले. तेव्हा या उमेदवारांच्या परिचय पत्रकावर वल्याळ यांचा फोटो असेल. यंदा 2025 मध्ये तब्बल 9 वर्षांनी निवडणूक होतेय. यापैक़ी आता कुणीही भाजपाचे उमेदवार म्हणून अथवा अन्य कोणत्याही पध्दतीने निवडणूक़ रिंगणात उतरलेले नाहीत. नागेश वल्याळ यांचे नाव प्रभाग 9 आणि 11 मध्ये चर्चेत होते. पण त्यांना भाजपाची उमेदवारी न मिळाल्यामुळे दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघार घेतला. नागेश वल्याळ यांना उमेदवारी दिली की नाही,त्यांनी निवडणूक़ लढवली की नाही, हा मुद्दा महत्वाचा नाही. पण जे उमेदवार, ज्यांना स्व.वल्याळ यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात संधी दिली. नगरसेवक केले, पदं दिली. सन्मान दिला. यापैकी काही जण सध्या निवडणूक़ रिंगणात आहेत. भाजपा उमेदवार वा अन्य पक्ष किंवा अपक्ष म्हणून निवडणूक़ लढवत आहेत, यापैकी किती उमेदवारांनी आपल्या (निवडणूक प्रचार पॉम्प्लेट) परिचय पत्रकात वल्याळ यांचे छायाचित्र वापरले आहे? त्यांना देखील वल्याळ यांचे विस्मरण झाले असावे. हा आहे काळाचा महिमा...
अटलबिहारी वाजपेयींची जन्मशताब्दी..
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी भाजपाचे पहिले प्रधानमंत्री. त्यांची जन्मशताब्दी गतवर्षी झाली. त्यांचे प्रासंगिक स्मरण केले जाते. त्यांच्या नावावर मते मागू नयेत, असे काही जणांचे मत असू शकते. ही वस्तुस्थिती आहे. ही निवडणूक लोकसभेची आहे का? प्रश्न कोणती निवडणूक हा नाही. पण त्यांचे छायाचित्र, त्यांची विचारधारा, त्यांचे स्मरण किती उमेदवारांना आणि नेत्यांना असू शकेल. यंदा मनपा निवडणुकीत सर्व 102 जागा भाजपा लढवत आहे, हे निश्चितच अभिमान आणि अभिनंदयीय! पण 102 उमेदवारांपैकी नेमके भाजपाचे किती? ज्यांना, अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मशताब्दी झाली हे माहीत आहे. नवागतांचे स्वागत आहेच, पण इतिहास, परंपरा,विरासत,पूर्वज यांचे विस्मरण करून चालेल?
What's Your Reaction?