काँग्रेस सोडलेल्यांची घुसमट!
म्हेत्रे शिंदे सेनेत, पण अक्कलकोट बसस्थानकची कोंडी जैसे थे आणि दुधनी चित्रपटगृहाचा परवाना रद्द. शौकत पठाणकडून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा घात, पण आता एमआयएमकडून बेदखल, शून्य दायित्वामुळे ना घरका ना घाट...

(विजयकुमार पिसे)
अपने घर मे शेर, अन् तिकडे गेले की ढेर.... अशी कैक उदाहरणं राजकारणात आहेत. सिध्दाराम म्हेत्रे काँग्रेसमध्ये राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळलं,17 वर्ष आमदारकी, महामंडळ, विधानसभा निवडणुकीत सलग दोन आपटी खाल्ल्यामुळे त्यांनी मे महिन्यात काँग्रेस सोडली, शिंदेसेनेची वाट धरली. शौकत पठाण सुशीलकुमार शिंदेनिष्ठ, लोकसभा निवडणुकीत प्रणितीताई यांना निवडून आणण्यात खटपट केली. पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला हात दाखवला, एमआयएमसोबत गेले. या बदल्यात त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची गॅरंटी दिली. पण हातात कागदच नाही. पक्षाची कार्यकारिणी जाहीर करायला आले. उद्विग्न झाले. आता राजकारणापासून काही दिवस फारकत घेण्याची भूमिका जाहीर केली. काँग्रेसवासीयांची ही दोन ताजी उदाहरणं...
म्हेत्रे आणि शौकत पठाण यांनी काँग्रेस सोडली, पण ज्या पक्षात गेले, तिथे घुसमट होत असल्याचे दोन अनुभव समोर आहेत. आज भाजपाकडे इनकमिंगसाठी वेटींगवर अनेकजण आहेत, तिथे रेडकार्पेट दिसते. धोक्याचा लाल बावटा दाखवल्यामुळे त्यांचा नाईलाज होत असेल. पण आगंतुकांपैक़ी सगळ्यांनाच मान सन्मान, पद,तिकीट मिळेल याची काय गॅरंटी!
अक्कलकोटमध्ये नवीन बसस्थानक उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. पण काही अतिक्रमित लोकांसाठी बसस्थानकातून जा,ये साठी रस्ता मोकळा करून द्या, अशी मागणी त्यांच्या पक्षाचे (शिंदेसेनेचे) परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती, त्यांनी तात्काळ मान्य केल्याचे सांगितले. पण विधानसभा अधिवेशनात आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी परिवहन मंत्र्यांनाच लक्ष्यवेधी प्रश्न विचारून बुरखा फाडला. त्यांनी स्पष्टच सांगितले. असा कोणताही निर्णय नाही, नियोजित ठरल्याप्रमाणेच बसस्थानकाचे बांधकाम होईल. म्हेत्रेंचा प्रश्न निकाली निघाला.
दुधनीत सिध्दाराम म्हेत्रे परिवाराशी निगडित बालाजी चित्रमंदिराचा परवाना विभागीय आयुक्तांनी अपिलात रद्द केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा निर्णय कायम ठेवला. म्हेत्रेंचे बंधू शंकर म्हेत्रे यांनी जिल्हाधिकार्यांच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे अपिल केले होते. त्यांनी म्हेत्रेंचे अपिल निकाली काढले. बालाजी चित्रपटगृहात जुगार अड्डा चालतो, या संशयावरून सन 2021 मध्ये दोन वेळा धाडी घातल्या तेव्हा तिथे रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले होते. शिवाय जुगार खेळण्यास आलेले संशयितही आढळून आले. (शिंदे)सत्तेत असूनही म्हेत्रेंचे काहीच चालले नाही, जे काही नियमानुसार आणि कायदेशीरच.
शौक़त पठाण यांच्या नातेवाईकपैक़ी पटेल यांना काँग्रेसने नगरसेविका म्हणून संधी दिली. महापालिकेत सभापतीचे पद मिळाले. महिला आघाडी अध्यक्षा म्हणूनही पटेल यांचे नाव चर्चेत होते. पण विधानसभा निवडणुकीत पठाण यांनी काँग्रेस सोडली, एमआयएमला साथ दिली. पक्षश्रेष्ठींनी एमआयएम जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची घोषणाही केली. ही घोषणा हवेतच विरली की काय? त्यामुळे शौकत पठाण निराश झाले आहेत. काँग्रेस छोड दी, एमआयएमचा सहाराही दिसत नाही. तिथेही कटी पतंग! त्यामुळे जायें तो कहाँ? असा उद्विग्न सवाल आहे.
What's Your Reaction?






