विहिंपचे मंदिर स्वाधिनता आंदोलन; केंद्रीय प्रबंध समिती बैठकीत निर्णय
सरकारच्या ताब्यात मंदिरे नकोत, ती मुक्त करा, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अॅड. आलोककुमार यांची माहिती, सप्टेंबरमध्ये व्यापक अभियानास प्रारंभ
(विजयकुमार पिसे)
मंदिरांच्या सरकारी नियंत्रणाविरूद्ध आणि हिंदू समाजाला खंडित करणार्या शक्तींविरूद्ध एकजुटतेचा संकल्प जळगाव येथील विहिंपच्या केंद्रीय प्रबंध समिती बैठकीत करण्यात आला, अशी माहिती आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अॅड. आलोककुमार पत्रकार परिषदेत दिली.
सरकारी नियंत्रणापासून मंदिरे मुक्त होण्यासाठी विहिंप बैठकीत कृती योजना तयार केली गेली आहे. समस्त हिंदू समाजाचे प्रतिनिधी 7 ते 21 सप्टेंबर या कालावधीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटून यासंदर्भात निवेदन सादर करतील. प्रत्येक महानगरातील प्रबुद्ध लोकांचे समर्थन वाढविले जाईल. तसेच देशभरातील सर्व विधानसभा अधिवेशनादरम्यान सर्व पक्षांच्या आमदारांशी व्यापक संपर्क केला जाईल. जेणेकरून ते त्यांच्या राज्य सरकारांवर दबाव आणून मंदिरे स्वतंत्र करतील. मंदिरे यापुढे सरकारच्या ताब्यात राहणार नाहीत. हिंदू समाज त्यांना मुक्त करूनच राहील. विहिंप केंद्रीय प्रबंध समिती बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना अॅड. आलोककुमार म्हणाले की, हिंदूऐक्यावरील हल्ल्यांना चोख उत्तर देण्यासाठी हिंदू समाजातील विविध घटकांना जाती, भाषा, प्रांत, प्रदेश आणि लिंग इत्यादींच्या आधारे विभक्त करण्याच्या विभाजनावादी मानसिकतेविरूद्ध बैठक़ीत ठराव पारित झाला आहे, ज्यात संपूर्ण हिंदू समाजासह सर्व कार्यक़र्ते, आदरणीय संत,महंत आणि सामाजिक संघटनांनाही आवाहन केले आहे. संपूर्ण हिंदू समाजाला तोडणार्या अशा शक्तींचा डाव ओळखून त्यांना नि:पात केले पाहिजे.
पीडीए,आर्य/द्रविड,प्रांत/प्रादेशिकता,जाती/भाषा,लिंग भेद असे काही मुद्दे घेऊन हिंदू समाजात फूट पाडण्याचा काही शक्तींचा कुटील डाव आहे. त्यांचा मुकाबला करण्यासाठी आपली एकजूटता हवी. 1969 मध्ये विहिंपने संकल्पच केला होता की, हिंदवा: सोदरा: सर्वे, ना हिंदू पतित भवेत् अर्थात आम्ही हिंदू सर्व एक आहोत. या संदर्भात, विहिंपच्या केंद्रीय प्रबंध समितीच्या बैठकीत *"संघटित आणि मजबूत हिंदू हा सामाजिक विखंडनाच्या षडयंत्रांचा एकमेव उपाय"* असा प्रस्ताव पारित केला आहे.
या प्रस्तावात असे म्हटले आहे की, या विघटनकारी शक्तींंमध्ये विस्तारवादी चर्च, कट्टरपंथी इस्लाम, मार्क्सवाद, धर्मनिरपेक्षतावादी आणि भांडवलशाही गट सक्रिय आहेत. त्यासाठी, विदेशी वित्तपुरवठा करणारे घटक, पुरोगामी, धर्मातरण करणार्या शक्ती आणि भारत विरोधी वैश्विक समूह (ग्लोबल ग्रुप्स) त्यांच्या पाठिशी आहेत. त्यांचे लक्ष्य हिंदू समाज तोडणे आणि भारताच्या मुळांवर हल्ला करणे होय. हिंदू समाजाने या विघटनकारी शक्ती ओळखल्या पाहिजेत तसेच सरकारने आपल्या अभ्यासक्रमात नैतिक शिक्षणाचा समावेश केला पाहिजे असे आवाहन केले आहे.
दोन दिवसीय प्रबंध समिती बैठकीत, विहिंपचे केंद्रीय महामंत्री बजरंगलाल बागडा यांनी अर्धवार्षिय प्रगती अहवाल सादर केला. संघटन महामंत्री मिलिंद परांडे, सहसंघटन महामंत्री विनायकराव देशपांडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपतराय, कोषाध्यक्ष रमेश गुप्ता, तसेच बजरंग दल, दुर्गावाहिनी, मातृशक्ती, गोरक्षा, सेवा, समरसता, सत्संग, धर्मप्रसार, मठ मंदिर आयामचे राष्ट्रीय आणि क्षेत्रिय संयोजक उपस्थित होते.
What's Your Reaction?