आरक्षणानंतर "लोटस"ची वारी!
आयाराम,गयारामचा करेक्ट कार्यक्रम "ग्यारंटी" के साथ!
(विजयकुमार पिसे)
महापालिकेचे आरक्षण निघाले आणि इकडे "लोटस"च्या वारीचे वेध लागले. मलाच तिकीट मिळाले पाहिजे "गॅरंटी" के साथ, असा दावा करीत राजकारणातील दादा मंडळीदेखील "लोटस" वारीत येत आहेत. अण्णा,भाऊ,काका,मामा तर महिलांमध्ये ताई,अक्का, मामी,भाभी अशी यादी मोठ्ठी. वारे कुठे वाहताहेत,याचा अंदाज असतो, अशा दादा मंडळींचा त्यामुळे आयाराम,गयाराम करेक्ट कार्यक्रम सुरू होईल.
गत महापालिका निवडणुकीत भाजपाने आरपीआय, शिवसेना यांच्या पक्षातील तगड्यांच्या हातात कमळ दिले. अपेक्षित निकाल लागला. पक्षांची अनेक शकले झाली आहेत. बसपा, वंचित, राष्ट्रवादी असा प्रवास, दादाचा पुढला पाडाव? कडवट शिवसैनिक. ठाकरे घराण्याशी निष्ठा. देगावात वडील,आई आणि स्वत: मेंबर असं वर्तुळ. शिवसेनेत मीच गॉडफादर. पण परिवहनच्या स्टेरिंगशिवाय हाती काही आलं नाही. आमदारकी नशिबात नाही. पोरं,लेकी,पुतणे यांनाही मेंबर करणं जमलं नाही. आयुष्यभर भगवा खांद्यावर घेऊनही अपयश. कोणता झेंडा घेऊ हाती, या प्रश्नाचं उत्तम उत्तर म्हणजे भगवाच. पण खांदा दुसरा.
झोपडीतला, चाळीतला पंत, भाऊ अशी ओळख. आता राजकारणात गब्बर. पण गतवेळी हार पत्करावी लागली. पुन्हा नशिबी पराभव नको, म्हणत विधानसभा निवडणुकीत दादासोबत आले. त्याबदल्यात संधी पाहिजे. आधी पवार साहेबांची साथ सोडून एकनाथ झाले. तिथेही अनाथ झालेले भाऊ रात्रीच्या अंधारात कमलधारी झाले, हे आश्चर्यच. त्यासाठी प्रभाग फोडून झाला. दादा/ताई तिकीट देतील. पण चाळीतील मतदारांचं काय? मराठा तितुका मेळवावा, पण आमच्यातच पिसाळलेले खूप आहेत, म्हणून त्यांचा उध्दार. तरीही शाळा ताब्यात ठेवण्यात यश. आता नवा संघर्ष पुतण्याबरोबर. त्याचा मार्ग वेगळा. त्यामुळे पुन्हा धपाटे मिळाले तर?
तालमीतले दोन पैलवान रात्रीच्या अंधारात एकदम दक्ष झाले. बहुदा आम्हाला फसवलं गेलंय ही भावना. घाऊक गेटकेनची किंमत म्हणजे असे पत्रास लई पडलेत. यापेक्षा मालक बरे. आपली त्यांच्याशी दुश्मनी नाही. विधानसभेला सोबत असतोच. गतवेळचा पराभव पुसण्यासाठी हा मार्ग बरा. असाच खेळ बाळ्यातील अण्णाचा. रात्रीच्या गेटकेनची चर्चा इतकी, पदरी बदनामी आली. विधानसभेला ताईची साथ सोडली. विकास कामाचा फडशा पडू लागला. गुरूनानक जयंतीला ताईंचा भला मोठा डिजीटल. आपली वाट चुकलीय असं ताईला वाटतंय. म्हणून घरवापसीची तयारी?
शहर उत्तर व मध्यच्या सीमेवर 50/50 हिस्सा, वीटभट्टीवाले अण्णा कमरेला बंदपट्टा बांधून सज्ज झाले आहेत. त्यांनाही लोटसचे वेध लागलेत, अशी खबर लागली आहे.
मध्य व दक्षिणच्या सीमेवरील निष्काळजीपणामुळे केसमध्ये अडकलेले भाऊ, स्वत:ला सावरलेत. पुन्हा "प्राविण्य" मिळवू शकतो. म्हणून झेंडा बदलला तर? शेजारचे बाबाजानी, हात सोडला. तिथे कुणी तुतारी सोडली. आता घड्याळ बांधण्याची पतंगबाजी सुरूया. भाभी अजून तळ्यात मळ्यात. पक्षापेक्षा व्यक्तीनिष्ठ अक्काचं तिकीट फिक्स असतंय. पण गोंधळात निसटंतय. आता देखील असंच काही शिजतंय. तेव्हा विश्वास ठेवायचा कुणावर? विश्वास पक्षावर, संघटनेवर,नेत्यावर आहेच. तिथं घात झाला तर? मतदारांवर असेल विश्वास. जा तिथं आणि लढ. जीत अपनी है शान से।
(पिक्चर अभी बाकी है)
What's Your Reaction?