श्रावण मासारंभ : हत्तूरचे सोमेश्वर देवस्थान
श्रावण मासारंभ : हत्तूरचे सोमेश्वर देवस्थान

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे बाराव्या शतकातील प्राचीन श्री सोमेश्वर देवस्थान आहे. नवसाला पावणारा जागृत देवस्थान म्हणून या शिव मंदिराची ख्याती आहे. मंदिराच्या शेजारी सोमेश्वर देवाचे शिष्य श्री बनसिध्देश्वर महाराजांचेही मंदिर आहे.
श्री सोमेश्वर हे शंकराचे अवतार मानले जातात. सिध्द संप्रदायातील थोर सत्पुरुष श्री अमोगसिध्द महाराज यांनी शिवशंकरला प्रसन्न करून घेण्यासाठी कडक तपश्चर्या केली. अमोगसिध्द महाराज यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन शिवशंकर भगवान मकणापूर (जि. विजयपूर) येथे सोमलिंग या नावाने प्रकट होऊन त्यांना आशीर्वाद दिला. ओगण्णा महाराज यांनी आपले चिरंजीव बन्नसिध्देश्वर महाराज यांना गुरू सोमलिंग यांना मकणापूरला बोलावून आणावेत अशी आज्ञा केली. यावेळी बन्नसिध्देश्वर महाराजांनी ही जबाबदारी आपले पुत्र पडदानसिध्द यांच्यावर सोपवली. यावेळी श्री पडदानसिध्द महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. यावेळी श्री सोमेश्वर प्रसन्न झाले आणि हत्तूर नगरीत आले. याचवेळी हत्तूर येथे सोमेश्वर मंदिर बांधण्यात आले. कालांतराने मंदिराची पडझड झाली. भीममुत्या महाराजांनी चमत्कार करून पैसे निर्माण करून पुन्हा मंदिर बांधले. १९६७ साली चंद्रशेखर हावडे-पाटील आणि भक्तांनी मंदिराची डागडुजी करून सभामंडप बांधले आहे. २००३ साली भीमराव पाटील-वडकबाळकर यांनी मंदिराचा जीर्णोध्दार केला. यावेळी आकर्षक पध्दतीने सोमेश्वराचे भव्य शिवलिंग घडविण्यात आले. हे तेजस्वी आणि नेत्रदीपक शिवलिंग साडेचार फुटाचे असून हे शिवलिंग पाहताच मन प्रसन्न होते. शिवलिंगाच्या पाठीशी आठ फुटाच्या श्री शंकर-पार्वतीची सुबक मूर्ती आहेत. मंदिराच्या दरवाजाशेजारी अजय-विजय या दोन द्वारपालाच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर दोन भव्य नंदी आहेत. तसेच गणपती, हनुमान, शनी देवाच्या मूर्ती आहेत. सोमेश्वर मंदिराच्या पाठीमागे नऊ फुटी श्री भूताळसिध्द महाराजांची मूर्ती आहे. डाव्या बाजूला ओगण्णामुत्या महाराज, श्री बनसिध्देश्वर महाराज, पडदानसिध्द महाराज, हुल्लीबंदप्पा वडिया, कन्नमुत्या महाराज, ज्योत्यप्पा महाराज, भीममुत्या महाराज, सामण्णामुत्या महाराज यांच्या मूर्ती आहेत. श्रावण महिन्यात श्री सोमेश्वर मंदिरात प्रवचन, हरिनाम सप्ताह, कुंभ मिरवणूक, ढोळ्ळीवरील गाण्याचा कार्यक्रम होतात. दर सोमवारी सोमेश्वर देवास सीना नदीतून पाणी आणून महाभिषेक केला जातो. नवसाला पावणारा श्री सोमेश्वर अशी आख्यायिका असल्याने प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या प्रचाराचा शुभारंभ या गावपासूनच करतात. बन्नसिध्देश्वर महाराज हे सिध्द पुरुष होते. हत्तूर ग्रामस्थांना एक राक्षस खूप त्रास देत होता. तेव्हा बन्नसिध्देश्वर महाराजांनी राक्षसाबरोबर युध्द करून त्याला ठार मारले आणि नागरिकांची या त्रासातून कायमची मुक्तता केली. दरम्यान महाराजांनी अनेक चमत्कार केले त्यामुळे त्यांचे या ठिकाणी मंदिर बांधले आहे, अशी भाविकांची श्रध्दा आहे. दरवर्षी मकर संक्रांतीला सोमेश्वर व बन्नसिद्धेश्वर महाराजांची एकत्रित यात्रा भरते.
What's Your Reaction?






