तुळजापूर ड्रग्जचे सोलापुरी सावकाराचे कनेक्शन; 'यार्डा'त शोधले 'मार्केट'?
तुळजापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीमावर्ती गावांत नेटवर्क, ग्रामीण भागातही माफिया सक्रिय; युवकांनो नशाखोरी रोखा, विहिंपने वेधले लक्ष

(विजयकुमार पिसे)
तुळजापूरच्या ड्रग्ज तस्करीत युवकांनाच लक्ष्य केल्याचे निदर्शनास आले असून आंतरराष्ट्रीय रॅ़केट यामध्ये सक्रिय असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या रॅ़केटचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. दरम्यान सोलापुरी सावकाराचेही कनेक्शन असू शकते, अशी नवी माहिती समोर येत आहे. हे 'मस्ती'खोर राजकीय नेते कोण, याविषयी तर्क सुरू आहे.
तीर्थक्षेत्र तुळजापूर या ड्रग्ज प्रक़रणाने बदनाम होत आहे, दुर्दैवाने काही पुजार्यांचाही सहभाग असल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. माजी नगराध्यक्ष संतोष कदम यास ताब्यात घेतल्यानंतर यामध्ये अनेक बडी असामी सक्रिय आहेत, हे अधोरेखित झाली. अलीकडेच जीवन साळुंके या तरुण कार्यकर्त्यास तामलवाडी पोलिसांनी सोलापुरात अटक केली. त्यामुळे तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील अनेक तरुण कार्यक़र्ते यामध्ये आहेत, ही बाब चिंताजक आहे. तुळजापूर, तामलवाडी, इटकळ, पिंजारवाडीमार्गे दक्षिण सोलापुरात हे लोण पोहोचले आहे. तुळजापूर, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या तीन तालुक्यातील सीमावर्ती भागात छोटी,मोठी गावं, वाड्या, वस्त्या, तांडे येथपर्यंत ड्रग्जची साखळी असू शकते.
प्राप्त माहितीनुसार तांदुळवाडी, मुस्ती, धोत्री, बोरामणी, वडजी, संगदरी, दर्गनहळ्ळी, मुळेगाव, तांडा या गावांची नावे समोर येत आहेत. त्यादृष्टीने तपास लागण्याची आवश्यकता आहे.
ड्रग्ज माफियांचे तुळजापूर हे सेंटर असून ग्रामीण भागातही त्यांचे मोठे नेटवर्क असल्याचे बोलले जाते. एरवी मोठ्या शहरांतून ड्रग्ज तस्करी चालायची. मुंबई, पुणे, सोलापूर, पुढे हैदराबाद अशी ही साखळी असून महामार्गावरील गावांमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणे या तस्करांना सोपे आहे. ड्रग्जच्या जाळ्यात काही शेतकरीही ओढले जात आहेत. सोलापुरातून सुरत/चेन्नई एक्सप्रेस हायवे जाणार असून त्याचे भूसंपादन सुरू आहे. यात मिळणारा बक्कळ पैसा ड्रग्जमध्ये ओढण्यासाठी माफियांनी शक्कल लढवून या तीन तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच त्यांचे काही सावकारांशी साटेलाटे असावे. राजकीय क्षेत्रात वावर असणार्या मंडळींनी यासाठी "यार्डा"तही ( APMC) "मार्केट" शोधले अशी कुजबूज आहे.
*युवकांना विहिंपचे आवाहन...
दोन दिवसांपूर्वी पंजाबच्या एक़ा माजी मंत्र्यास संशयावरून अटक झाली. ड्रग्जवर "उडता पंजाब" हा चित्रपटही निघाला. काही वर्षापूर्वी बॉलिवूडची ममता कुलकर्णी हिचेही नाव ड्रग्ज तस्करीत जोडले गेले. ही काही ज्वलंत उदाहरणे. महाकुंभ प्रयागराज येथे विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रन्यासी मंडळाची बैठक़ फेब्रुवारीत (2025) पार पडली. देशभरातून 16 कोटीपेक्षा अधिक़ लोक ड्रग्जच्या विळख्यात असून यामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बेरोजगार व गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे, आरोग्य, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे. विदेशी शक्तींचा हा कट आहे. याकडे लक्ष वेधून नशाखोरी रोखण्याचे युवकांना आवाहन केले. तसेच धार्मिक संस्था, संघटना, संत, महंत, धर्माचार्य यांनी ड्रग्ज विरोधात जनजागरण करावे, असा ठराव विहिंपने यावेळी पारित केला.
What's Your Reaction?






