विहिंपचे यंदा हितचिंतक नोंदणी अभियान : मिलींद जी परांडे
संघटन महामंत्री मिलींद परांडे यांचा अनेक मान्यवरांंशी संवाद, ग्रामदैवत सिध्दरामेश्वर मंदिरास भेट व दर्शन
सोलापूर, : विश्व हिंदू परिषदेचे देशभरात सर्वत्र व्यापक जनसंपर्कासाठी दर तीन वर्षांनी होणारे हितचिंतक नोंदणी अभियान नजीकच्या काळात होत असून सर्व कार्यकर्त्यांनी हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन विहिंपचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलींद जी परांडे यांनी सोलापुरात केले.
लातूर येथे विहिंपच्या संघटनात्मक प्रवासानिमित्त श्री.परांडे यांचे सोलापुरातील अंत्रोळीकर नगर भागात विहिंपचे जिल्हा अध्यक्ष विष्णू मोंढे यांच्या निवासस्थानी काही काळ वास्तव्य होते. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत संवाद, परिचय आणि चर्चा झाली. हिंदू धर्माचा गौरवशाली इतिहास, विश्व हिंदू परिषदेची स्थापना व कार्यपद्धती याविषयी त्यांनी माहिती दिली.
हिंदू समाजात सक्षम व संस्कारित व्यावसायिक निर्माण करण्याची आवश्यकता असून, कुटुंब प्रबोधन, हिंदू समाजाच्या लोकसंख्येत घट, लँड जिहाद, हिंदू अस्मिता व धर्मरक्षणासाठी प्रत्येकाने सक्रियपणे व समर्पित भावनेने धर्मकार्यात सहभागी होण्याची गरज याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हिंदू समाजात व्यापक संपर्क, संवादासाठी दर तीन वर्षांनी विहिंपचे हितचिंतक नाेंंदणी अभियान होते. यंदा नजीकच्या काळात हे अभियान होणार असून यासंदर्भात केंद्र व प्रांत स्तरावरून मार्गदर्शकपर माहिती तसेच कालावधी व या उपक्रमाची माहिती येईल, तेव्हा विहिंप कार्यकर्त्यांनी हितचिंतक अभियान अधिक प्रभावीपणे राबवावे आणि ग्राम पातळीपर्यंत संघटनेचा व्यापक विस्तार करावा, असे आवाहन परांडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले. सामाजिक समरसता, संघटन विस्तार, सेवा कार्य, युवक सहभाग व आगामी उपक्रमांच्या अनुषंगानेही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, अशी माहिती विहिंपचे विभाग मंत्री विजयकुमार पिसे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
दरम्यान ग्रामदैवत श्रीसिद्धरामेश्वर मंदिरास श्री. परांडे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. मंदिर परिसर पाहणीत सुवर्ण सिध्देश्वर प्रकल्प बांधकाम व अन्य उपक्रमांची माहिती घेतली. तसेच मंदिराचे वतीने सुरू असलेले धार्मिक, सामाजिक व सेवा उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. श्री.परांडे यांच्या भेटीप्रसंगी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी संस्थेच्या धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक कार्य, संस्कृत वैदिक शाळा, श्री सिद्धेश्वर अध्ययन केंद्र व ग्रंथालयाविषयी श्री. परांडे यांना अवगत केले.
या भेटीदरम्यान देवस्थान समितीचे वतीने मिलींद परांडे यांचा अध्यक्ष काडादी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पंचकमिटीचे उपाध्यक्ष सिध्देश्वर बमणी, विश्वस्त नीलकंठप्पा कोनापुरे, बाळासाहेब भोगडे, गिरीश गोरनळ्ळी, पशुपतीनाथ माशाळ, विलास कारभारी, प्रकाश बिराजदार, रतन रिक्के, प्रभुराज मैंदर्गीकर, सिध्देश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, शरणराज काडादी, तसेच विहिंपचे कर्नाटक प्रांत अध्यक्ष लिंगराज अप्पा, धर्माचार्य प्रांत सहसंपर्क प्रमुख नागनाथ बोंगरगे, जिल्हा अध्यक्ष विष्णू मोंढे, उपाध्यक्ष अॅड.केदार पाटील, जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे, सहमंत्री बापू कदम, बाबू गिरगल, विभाग सहमंत्री संजयकुमार जमादार, बजरंग दल संयोजक अभय कुलथे, अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?