नामकरणावरून भाजप महिला नगरसेविकांचा सामना
अलकुंटे चौक अस्तित्वात असताना नामकरणाचा घाट; वडार बांधवांच्या भावना तीव्र, चौकाचे नाव बदलण्यास नगरसेविका कादंबरी मंजेली यांचा तीव्र विरोध
सोलापूर : २००२ पासून अलकुंटे चौक अस्तित्वात असताना प्रभाग १७ च्या नगरसेविकांनी नवीन नामकरणाचा प्रस्ताव मनपा सभेत दाखल केल्यामुळे वडार समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. प्र.१३ मधील अलकुंटे चौकाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावास प्रस्ताव. ९ च्या भाजप नगरसेविका कादंबरी प्रकाश मंजेली यांनी तीव्र विरोध केला आहे. सदर चौकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अशी मागणी त्यांनी महापौर व सभागृह नेता यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
स्वातंत्र्यसैनिक स्व. नागनाथ अडव्याप्पा अलकुंटे हे सोलापूर महानगरपालिकेचे माजी सदस्य तसेच स्थायी समितीचे माजी चेअरमन होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांच्या नावाने ओळखला जाणारा अलकुंटे चौक हा केवळ भौगोलिक ओळख नसून वारसा असल्याचे मंजेली यांनी निवेदनात म्हटले आहे.
महानगरपालिका सभेत ५ जून २००२ रोजी तत्कालीन सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावाद्वारे अलकुंटे चौक नामकरण ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे आता हे नाव अस्तित्वात असून बदलण्याचा निर्णय नागरिकांच्या भावना दुखावणारा ठरेल, असे मंजेली यांनी म्हटले आहे. शिवाय समाजाच्या भावनांचा अपमान आहे, अशी भूमिका घेत त्यांनी अलकुंटे चौकाचे नाव कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
सदर प्रस्ताव रद्द न केल्यास नागरिकांच्या माध्यमातून तीव्र विरोध करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान समस्त सोलापूर शहर व जिल्हा वडार समाजातर्फे व नगरसेवक विनायक विटकर, नगरसेविका अंबिका चौगुले, माजी नगरसेविका महादेवी अलकुंटे, संदीप शिंगे, महेश अलकुंटे, अनिल चौगुले, रोहित अलकुंटे, सिद्धार्थ मंजेली, जितू अलकुंटे, अनिल चौगुले, राजू लिंबोळे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
What's Your Reaction?