आदिवासी,वनवासी भागात १५५ ठिकाणी विहिंपची एक पाडा(वस्ती), एक गणपती योजना
मिशनर्यांना चोख उत्तर..दुर्गम भागातील वनवासी बंधूंना प्रतिष्ठापनेसाठी विश्व हिंदू परिषदेचा आगळावेगळा उपक्रम
(विजयकुमार पिसे)
सोमवारी सर्वत्र वाजत गाजत, हर्ष, उल्हासात आणि जल्लोषात गणपती बाप्पांचे स्वागत झाले. विघ्नहर्त्याची विधीवत प्रतिष्ठापना झाली. यंदा वनवासी आणि आदिवासी पट्ट्यात विश्व हिंदू परिषदेने आगळा वेगळा उपक्रम राबविला. जेणेकरून वनवासी बांधवांना आपले परंपरागत सण, भक्तीचा जागर करणे शक्य झाले. नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी,वनवासी भागात तब्बल १५५ ठिकाणी विहिंपतर्फे एक पाडा(वस्ती), एक गणपती योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागातील वनवासी बंधूंना प्रतिष्ठापनेसाठी श्री मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.
नाशिक, मालेगाव जिल्ह्यातील कळवण (तालुका) प्रखंड व सटाणा प्रखंडातील दुर्गम वस्ती, पाडे या भागात श्री मूर्ती वाटपाचा कार्यक्रम गणराय आगमनाच्या पूर्वसंध्येला पार पडला. एक पाडा, एक गणपती या तत्वावर प्रत्येक आदिवासी पाड्यात एक श्री मूर्ती देण्यात आली. सदर मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन तेथे १२दिवस श्री ची मनोभावे पूजा व आरती होईल. विशेष म्हणजे या आदिवासी, वनवासी भागात ख्रिश्चन धर्मांतरणाचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होतात, अशी माहिती आहे. मिशनर्यांच्या धर्मांतरणास विहिंपच्या या योजनेमुळे व कृतीमुळे आदिवासी वन बांधवांमध्ये हिंदू धर्मीय तसेच देवी देवतांबद्दल भक्ती, आदर व धर्म निष्ठा वाढून ते मूळ प्रवाहात (हिंदू) येण्यास खूप मदत होणार, असा विश्वास आहे.
दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावर...एक पाडा एक गणपती या संकल्पनेतून सदर भागात अजूनही काही ठिकाणी धर्मांतरण चालू असून ते थांबवण्यासाठी आपल्या देव,देश, धर्माप्रती स्वाभिमान जागृत होऊन ते मूळ प्रवाहात राहतील. बागलाण तालुक्यात ७० व कळवण ४५ तसेच पेठ भागात ४० श्री मूर्तींचे वाटप करण्यात आले. श्री मूर्ती वाटप प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत, जिल्हा मंत्री अॅड विजयकुमार भावसार, सहमंत्री वाल्मीक सैंदाने उपस्थित होते. तसेच प्रदीप बच्छाव व चिरंजीव सानप तसेच पाड्यातील व वस्तीवरील रहिवासी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?