आता राष्ट्रवादीचे विलीनीकरण अटळ, पुढच्या पिढीकडे धुरा!

अजित दादा परत या, कार्यकर्त्यांचा टाहो; सूर्योदयापूर्वीच उगणारा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला!

Jan 29, 2026 - 23:49
 0  356
आता राष्ट्रवादीचे विलीनीकरण अटळ, पुढच्या पिढीकडे धुरा!

(विजयकुमार पिसे)

महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने रोज सूर्योदयापूर्वीच उगणारा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! या सूर्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी गुरुवारी बारामतीत राज्य आणि देशभरातून आलेले अजितदादांवर प्रेम करणारे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अजित दादा परत या, म्हणत कार्यकर्त्यांनी टाहो फोडला. अंत्यसंस्काराप्रसंगी अजित दादा परत या। अजित दादा अमर रहे अशा घोषणा सुरू होत्या. यावेळी उपस्थितांनी साश्रु नयनांनी दादांना अखेरचा निरोप दिला. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान प्रांगणात दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. दरम्यान दादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली असून, सार्वत्रिक सूर तसाच आहे. त्यामुळे विलीनीकरण अटळ असल्याचे मानले जाते. तसेच पुढच्या पिढीकडे ही धुरा सोपविली जाईल, अशीही चर्चा आहे.

*विमान अपघाताची चौकशी होणार..

अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी अशी आग्रही मागणी पाहता विमानातील ब्लॅक बॉक्स तपासून चौकशी करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. समाज आणि जनतेसाठी समर्पित अजित पवार जी यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी लवकर भरून निघणार नाही, या शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रध्दांजली वाहिली. आज अमित शाह अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये आवर्जून उपस्थित होते. सरकारच्या वतीने त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.

*राष्ट्रवादी विलीनीकरणाकडे लक्ष..

 दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्याकडे लक्ष वेधले जात आहेे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास ते योग्यच ठरणार आहे. त्यामुळे दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकत्र येणार का, याबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे बंधू जसे एकत्र येऊन मनपाच्या निवडणुका लढवल्या, त्याच धर्तीवर अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपाच्या निवडणुका एकत्रित लढवल्या. त्याशिवाय जि.प. आणि पं.स.च्या निवडणुका अनेक ठिकाणी एकत्रित लढवल्या जात आहेत. यासाठी स्वत: अजितदादा आणि रोहित पवार यांच्या बैठका पार पडल्या आणि काही प्रमाणात अंमलातही आणल्या गेल्या. मंत्री हसन मुश्रीफ यांनीही यावर भाष्य केले आहे. माळशिरसचे आ.उत्तम जानकर यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर ताकद वाढेल असे विधान यापूर्वीच केले होते. त्यामुळे ते देखील अनुकूल आहेत. सोलापूर जिल्ह्यात पवार गटाचे चार आमदार आहेत, हे विशेष. जानकर यांनी अंतिम निर्णय शरद पवार साहेब घेतील, असेही स्पष्ट केले.

   यापूर्वीच पिंपरीतील एका कार्यक्रमात अजित पवारांनी, कालही आम्ही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो असे विधान केले होते, याकडे लक्ष वेधून घेतले जाते. त्यामुळे अजितदादा गेल्यानंतर पक्षातील पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आणि चर्चांना पुन्हा वेग आला आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow