राजकारणात नवा अध्याय!

खा.ज्योती वाघमारे हे शिवधनुष्य निश्‍चितपणे पेलतील

Mar 7, 2026 - 00:39
 0  46
राजकारणात नवा अध्याय!

(विजयकुमार पिसे,संपादक)

राजकारणात अनेक मास्टर स्ट्रोक रोजच होतायत. मात्र यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जो मास्टर स्ट्रोक लगावला, त्याचे पडसाद इतक्यात दिसणार नाहीत. पण सोलापूरच्या राजकारणात खासदार प्रा.डॉ.ज्योती वाघमारे यांच्या रूपाने नवा अध्याय या मास्टर स्ट्रोकमध्ये निश्‍चित आहे. मोची समाजाचा महाराष्ट्रातील एकमेव खासदार शिवसेनेने दिला आहे. ते देखील स्त्री शक्तीच्या रूपाने. रविवार ८ मार्च महिला दिनाच्या पूर्वसंध्येला खा.ज्योती वाघमारे यांचे आज सिध्दरामेश्‍वरांच्या पुण्यनगरीत आगमन होत आहे. सोलापूरकरांतर्फे लक्ष्यवेध न्यूज परिवारच्या वतीने खा.प्रा.डॉ. ज्योती वाघमारे यांचे अभिनंदन आणि मन:पूर्वक स्वागत।

   सोलापूरच्या राजकारणात मोची समाज निर्णायक. पण कोणत्याच सत्ताधारी (दोन्ही काँग्रेस व भाजपा आणि माकपा) पक्षाने या समाजाला निर्विवाद संधी दिली नाही. या समाजाची एकमेव इच्छा होती, आमच्या समाजाला विधानसभेत पाठवा. पण एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत मोची समाजाचा झेेंडा फडकवला. हाच तो मास्टर स्ट्रोक. आणि व्यक्त केलेला विश्‍वास सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय जोडला जाईल,असे मानले जाते.

   सोलापूरच्या राजकारणात मुख्यत: सुशीलकुमारांचा प्रभाव. त्यांनी देखील आपल्या कन्येचा सर्वप्रथम विचार केला. विधानसभा, लोकसभेसाठी या समाजाचा वापर केला. आंध्र,कर्नाटकातून रोजगारासाठी स्थलांतर झालेला मोची समाज आज जवळपास २ लाखापर्यंत आहे. शहर मध्य मतदारसंघात ६० हजार आहे. लोकसंख्या डेमोग्राफ बदलतो, त्या आधारे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मोची समाजाचा दावा काँग्रेेस,भाजपाने बेदखल केला. महापालिका हद्दीच्या पलीकडे मोची नेतृत्व जाऊ नये, ही खबरदारी घेतली. यंदाच्या मनपा निवडणुकीत सर्वाधिक़ ८७जागा भाजपाने जिंकल्या. यामध्ये फक्त तीन नगरसेवक मोची समाजाचे आहेत. हातचे राखून संधी दिली,काही ठिकाणी पडेल अशा जागा दिल्या. त्यामुळे मोची समाज सैरभैर झाला. एकनाथ शिंदे यांनी हे मर्म जाणले. मोची समाजाला खर्‍या अर्थाने न्याय दिला शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी. काँग्रेसच्या शिंदेंनी नव्हे. भाजपावर मोची समाजाचा विश्‍वास होता. पण..

   ज्योती वाघमारे राज्यसभेतील सोलापूरच्या चौथ्या खासदार. यापूर्वी ज्यांना संधी मिळाली, तसे ते प्रस्थापितच. शेकापचे भाई उध्दवराव पाटील, सुशीलकुमार शिंदे,रणजीतसिंह मोहिते पाटील हे यापूर्वीचे राज्यसभा सदस्य होत.ज्योती वाघमारे आंबेडकरी विद्रोही चळवळीच्या तडीतापडीतील कार्यकर्त्या. झोपडपट्टीचे जीवन जगलेल्या पण उच्च विद्या विभूषित. स्वकर्तृत्वाने सामाजिक क्षेत्रातून राजकारणात त्यांनी मोठी झेप मारली. तडीतापडीतील हिरा एकनाथ शिंदे यांनी हेरला, आणि थेट दिल्ली दरबारी संधी दिली. ही संधी म्हणजे सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय ठरेल, असे मानले जाते. 

   मोची समाजाला काँग्रेस, भाजपाने अव्हेरले, पण शिवसेनेने न्याय दिला. अलीकडच्या राजकारणात सोशल इंजिनिअरिंग हा परवलीचा शब्द. शिंदेनी ते कृतीशील करून दाखवले. त्यांच्या कृतीशील भूमिकेला आता नवा अध्याय जोडण्याचे शिवधनुष्य मा.खा.प्रा.डॉ.ज्योती वाघमारे यांना पेलायचे आहे. त्यासाठी लक्ष्यवेध न्यूूज परिवारतर्फे त्यांना शुभेच्छा...!

मोची समाजाच्या संघर्ष कन्या...देवेंद्र भंडारेे

दलित मोची समाजाला खासदार म्हणून संधी मिळाली. आमची अपेक्षा आमदारकीची होती. एकनाथ शिंदे यांनी थेट खासदारकी दिली. आमच्या समाजातील मुले/पुरुषच नव्हे तर मुली/महिला देखील झेप मारू शकतात. हा आत्मविश्‍वास संघर्षकन्या खा.ज्योतीतार्ईंच्या माध्यमातून दाखवून दिला आहे. आमचा उपयोग राजकीय पक्ष व नेत्यांनी स्वार्थासाठी केला. आम्हाला सोलापुरातच सीमीत ठेवले व त्यांनी मुंबई,दिल्ली गाठली. आज एकनाथ शिंदे साहेबांनी मोची समाजाला शिखरावर नेऊन ठेवले आहे. एका सामान्य दलित मुलीला संधी दिली, त्यांचे कोैतुक आणि आभार मानलेच पाहिजे. जे अन्य कोणत्याच पक्षाने वा नेत्यांनी केलेले नाही, ते शिंदे साहेबांनी करून मोची समाजाला आत्मविश्‍वास प्राप्त करून दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow