ममता महामंडलेश्‍वर!

बॉलिवूड ममता कुलकर्णी सापडली महाकुंभात; महामंडलेश्‍वर श्री यामाई ममता नंदगिरी हे नवीन नाव

Jan 25, 2025 - 11:20
Jan 25, 2025 - 14:44
 0  375
ममता महामंडलेश्‍वर!

ममता आणि महामंडलेश्‍वर ऐकून धक्काच बसेल. कारण ममता ह्या नावाला सनातनाची अ‍ॅलर्जी. आणि त्यात महामंडलेश्‍वर ही उपाधी म्हणजे पूर्वेकडून पश्‍चिम ध्रुवावर. दुसरे टोकच. ही ममता आहे बॉलिवूडची क्विन. एकेकाळी ड्रग्ज माफियाच्या विळख्यात सापडलेली ममता शनिवारी चक्क महाकुंभ मेळ्यात सापडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ममता दिसली ती भगव्या वस्त्रात. तिने संन्यास दीक्षा घेतली आहे. त्यामुळे बॉलिवूड क्कीन ममताच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तब्बल 144 वर्षानंतर आलेल्या अमृत कुंभमध्ये दररोज आचंबित करणार्‍या वार्ता कानावर पडत आहेत. आचंबित करणारी आणखी ही वार्ता म्हणजे ममता कुलकर्णी आता श्री यामाई ममता नंदगिरी या नावाने ओळखली जाईल. 

  अंगात भगवी वस्त्रे, कपाळावर चंदनाचा टिळा, गळ्यात रूद्राक्षाची माळ आणि खांद्यावर झोळी असा ममता-अवतार प्रयागराज महाकुंभात दिसला. किन्नर आखाड्यात ममताने आचार्य महामंडलेश्‍वर डॉ. लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची भेट घेतली. संन्यास दीक्षा घेण्यापूर्वी ममताने म्हणे कठोर अभ्यास केला. परीक्षाही दिली. या कठोर परीक्षेत पास झाल्यानंतरच ममताला महामंडलेश्‍वर उपाधी मिळाली, असा दावा तिनेच स्वत: केला आहे. महामंडलेश्‍वर या उपाधीने तिचा पट्टाभिषेकही होणार आहे. तिच्या दाव्यानुसार ममता 2013 मध्येे महाकुंभात सामील झाली होती. त्यामुळे महाकुंभ माझ्यासाठी नवीन नाही. आणि आता 52 व्या वर्षी सर्वसंग परित्याग करून ममता संन्याशी झाली आहे. महाकुंभात ममताने डुबकी मारून उपस्थित संन्याशी मंडळींसमवेत पिंडदानही करणार आहे. आचार्य डॉ त्रिपाठी यांनी ममताला आवश्यक वाटल्यास चित्रपटात काम करता येईल, असे सांगितले. पण ममता कुलकर्णीने आपण यापुढे मेकअप देखील करणार नाही. त्यामुळे चित्रपटात पुनरागमन अशक्य असल्याचे सांगितले. 

  1991 मध्ये तमीळ चित्रपट "नानबरगल" मधून ममताने फिल्मी करिअरची सुरवात केली. त्यापाठोपाठ मेरा दिल तेरे लिए हा चित्रपट आला. तब्बल 40 चित्रपटांमध्ये हिरोईन म्हणून गाजलेली ममता प्रत्यक्ष जीवनात ड्रग्ज माफियाच्या विळख्यात सापडली तेव्हा व्हीलन म्हणून ओळखली गेली. ती दुबईत पळून गेली. तिथे अंडरवर्ल्ड ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामी सोबत होती. आणि आता 25 वर्षानंतर ममताने आपल्या आयुष्यात तिसर्‍यांदा यू टर्न घेतला आहे. आणि हा यू टर्न अनपेक्षित आणि तितकाच धक्कादायक आहे.

बॉलिवूडमध्ये 1975 चा मनोज कुमार आणि हेमा मालिनी यांचा संन्याशी चित्रपट गाजला. चल संन्याशी मंदिर मे.…. हे युगल गीतही गाजले. या गीतामध्ये हेमाने संन्याशाची (मनोजकुमार) तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केल्याचाही प्रसंग आहे. ममता कुलकर्णी प्रत्यक्ष आयुष्यात चंदेरी दुनिया भंग करून सनातनी हिंदू धर्मातील संन्यास दीक्षा घेतली आहे. विनोद खन्ना यांनी देखील चंदेरी दुनियाला अलविदा करून ओशो आश्रमात दाखल झाले होते. त्यांनी आचार्य रजनीश यांच्याकडून संन्यास दीक्षाही घेतली होती. नंतर विनोद खन्ना बॉलिवूडमध्ये परतले. त्यानंतरही त्यांनी अनेक हिट देमार चित्रपट केले. पुढे आणखी एक यूर्ट घेतला. आणि भाजपाच्या तिकीटावर होशियारपूर (पंजाब) येथून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. केंद्रीयमंत्री देखील झाले. ममता कुलकर्णीचा प्रवास आता बॉलिवूड... दुबई ते महाकुंभ असा झाला आहेेे. न जाणो भविष्यात तिचा प्रवास या दिशेनेच झाला तर?

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow