आरोग्य केंद्रात मावा अड्ड्यावर आयुक्त डॉ. ओंबासेंची ‘मुंडे स्टाईल’ धाड

जिथे आरोग्य नांदते तिथे गुटखा पाणी चालते, आरोग्य केंद्र पाहणीसाठी गेले अन् मावा कारखान्याचा पर्दाफाश, आयुक्तांचा फोन व पोलीस घटनास्थळी

Oct 14, 2026 - 01:07
 0  2
आरोग्य केंद्रात मावा अड्ड्यावर आयुक्त डॉ. ओंबासेंची ‘मुंडे स्टाईल’ धाड

सोलापूर : साखर पेठेतील आरोग्य केंद्राची पाहणी करण्यासाठी गेलेले मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी या परिसरातील मावा  कारखान्यावर मुंडे स्टाईल धाड टाकली.
   तिथे मावा कारखाना नजरेस पडताच थेट पोलीस उपायुक्तांना फोन केला. व कारवाईचे आदेश दिले. तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीची आठवण करून देणाऱ्या या कारवाईमुळे गुटखा, मावा वाल्यान्चे धाबे दणाणले आहेत.
   प्र. ८ मधील नगरसेवकांच्या विनंतीवरून आयुक्त डॉ. ओंबासे साखर पेठ येथील कै. यशोदाबाई सिद्रामप्पा दिड्डी आरोग्य केंद्राला भेटीसाठी आले. तेव्हा आरोग्य केंद्राच्या पाठीमागील मोकळ्या जागेत  मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. एका ठिकाणी नवीन सायकल फिटिंगचा कारखाना सुरू होता. त्याच परिसरात जाळीच्या गेटमधून पाहणी केली असता चक्क मावा बनविण्याचा कारखाना सुरू असल्याचे निदर्शनास आले.
तेव्हा डॉ. ओंबासे यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. संबंधित माहिती दिली आणि कारवाईच्या सूचना दिल्या.


   जिथे आरोग्य नांदते, तिथे गुटखा पाणी
  नागरिकांना आरोग्यसेवा देण्यासाठी असलेल्या मनपा आरोग्य केंद्राच्या परिसरातच मावा बनविण्याचा कारखाना सुरू असल्याचा प्रकार धक्कादायक होय. एकीकडे जीर्ण इमारतीतून नागरिकांना आरोग्यसेवा तर दुसरीकडे आरोग्य केंद्राच्या जागेवर अनधिकृत असे गुटखा उद्योग हे उघड झाले. आरोग्य केंद्राच्या पाहणीसाठी आलेले आयुक्त थेट कारवाईच्या भूमिकेत शिरल्याने ‘मुंडे स्टाईल’ प्रशासनाचा प्रत्यय सोलापूरकरांना आला. आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या या धडाकेबाज भूमिकेमुळे अनधिकृत व्यावसायिकांना जोर का झटका बसला आहे.
   यावेळी आयुक्त डॉ. ओंबासे, आरोग्याधिकारी डॉ. राखी माने, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक प्रविण दर्गोपाटील, माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी, उपअभियंता अविनाश वाघमारे, विभागीय अधिकारी राघवेंद्र गायधनकर, कनिष्ठ अभियंता सलमान मणियार, जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तसेच महापालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow