1378कोटींची पा.पु.योजना मनपात मंजूर, 24 तास पाणी देणार : महापौर कोंड्याल
नियमित कर भरणार्या करदात्यांवर कोणतीही कर,दरवाढ नाही, पाण्याचे मीटर बसणार, जितका वापर तितकेच पाण्याचे बील, नरोटे, शिंदे निलंबित
सोलापूर : बहुचर्चित सोलापूरच्या पाणी पुरवठ्याची 892 कोटींची योजना आता 1378 कोटींची झाली असून,ज्यामुळे शहरवासीयांना दररोज 24 तास पाण्याची ग्वाही दिली असून शिवाय नियमित कर भरणार्यांना कोणतीही करवाढ आणि दरवाढ नाही, असे आश्वासनही आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुधारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली असून समतोल पाणीपुरवठ्याच्या दिशेने पाऊल आहे, या शब्दात महापौर विनायक कोंड्याल यांनी आश्वासित केले आहे. दरम्यान मनपा सभेत गोंधळ घातल्याबद्दल सेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना आज निलंबित करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असून आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांनी या योजनेत विशेष लक्ष घातले आहे. त्यापार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील पत्र परिषद घेउन या योजनेविषयी माहिती दिली. या योजनेसाठी जागतिक बँकेचे अर्थसाह्य मिळणार आहे. यापूर्वीच्या 892 कोटींची मंजूर योजनेमध्ये जागतिक बँक आणि महाराष्ट्र शासनाने काही सुधारणा सुचवल्या होत्या,असे महापौर कोंड्याल म्हणाले. सुधारित योजनेत दीडशे कोटीपर्यंत जीएसटी कराचा समावेश आहे. तसेच 150 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाईल. तसेच शुद्ध जलवाहिनी 77.8 कि.मी.29 एमएलचे 10एमबीआर, 53.3एमएलचे 30उंच जलकुंभ उभे राहतील. शिवाय 1117किमी जलवाहिनी असून आणि 2.48 लाख मिळकतींना पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहेत. यामुळे पाण्याची मोठी बचत होईल. जितका वापर तितकेच बिल नागरिकांना येणार आहे, असेही महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले. पुढील 40 वर्षांसाठीची योजना : मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ऐतिहासिक योजना सोलापूरला मंजूर झाली आहे. पुढील 40 वर्षांचा सोलापूर शहर विस्ताराचा विचार करून ही योजना बनवण्यात आली आहे. पालिका सभेत या योजनेस मिळालेली मंजुरी म्हणजे सकारात्मक पाऊल असेही महापौर कोंड्याल म्हणाले.
अशोभनीय वर्तनामुळे कारवाई :
नरोटे आणि शिंदे यांच्या निलंबनासंदर्भात समर्थन करताना महापौर कोंड्याल यांनी, दोन्ही नगरसेवकांचे सभागृहात अशोभनीय वर्तन झाले. अश्लील व अवमानकारक भाषा,शिवीगाळ,शिस्तीला बाधा यामुळे कारवाई करण्यात आली, असे सांगितले
What's Your Reaction?