विश्व हिंदू परिषदेच्या पहिल्या कारसेविका प्रभावती सारोळकर निवर्तल्या
मरणोत्तर देहदान..! मरावे परि देहकीर्ती रूपे उरावे!
सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक स्व. बापुराव उर्फ भास्करराव सारोळकर यांच्या धर्मपत्नी तसेच विश्व हिंदू परिषदेच्या पहिल्या कारसेविका तसेच पहिल्या माजी महिला जिल्हामंत्री तथा विहिंप गोसंवर्धन आयामाचे जिल्हा प्रमुख अमित सारोळकर यांच्या मातोश्री प्रभावती सारोळकर (वय ९२ वर्षे) यांचे सोमवारी वार्धक्याने निधन झाले.
तीर्थक्षेत्र अयोध्या येथील श्रीप्रभु रामचंद्राच्या जन्मभूमी आंदोलनात कारसेवक म्हणून सक्रिय भाग घेतल्या होत्या. तसेच विश्व हिंदु परिषदेच्या पहिल्या महिला जिल्हा मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते.
सोलापूर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी त्या केवळ मार्गदर्शक नव्हत्या,तर खऱ्या अर्थाने मातृवत आधारस्तंभ होत्या. परिषदेची सर्वांगीण माहिती, संघटनात्मक रचना, कार्यपद्धतीची सखोल जाण आणि कार्यकर्त्यांशी असलेली आत्मीय नाळ यामुळे त्या एक उत्तम संघटिका म्हणून ओळखल्या जात.कोणत्याही विषयावर योग्य दिशा देणे,कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे आणि संघटनेचा दृष्टिकोन स्पष्ट करणे हे त्यांच्या स्वभावातःच होते.
परिषदेच्या दृष्टिकोनानुसार मातृशक्ती ही समाजजीवनाचा कणा आहे, या भूमिकेतून प्रभावतीताईंनी सुरुवातीपासूनच निर्भीडपणे काम केले.त्या काळात मातृशक्तीचा संघटनात्मक सहभाग मर्यादित असताना त्यांनी जबाबदारी स्वीकारून धर्मकार्य,श्रीराम जन्मभूमी आंदोलन नेतृत्व,गोसंवर्धन, समाजजागृती आणि संघटन विस्तार या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या सहवासात घडलेले अनेक स्वयंसेवक आज विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत,त्यांचे सर्व कुटुंब परिषदेच्या कार्यात सक्रिय आहे.हीच त्यांच्या कार्याची खरी फलश्रुती आहे.सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण परिषदेच्या संघटन जीवनात त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. त्यांचे पती स्वर्गीय बापूराव सारोळकर यांच्या प्रमाणेच त्यांनी एका कार्यक्रमात मृत्यूपूर्वीच शासकीय रुग्णालयास देहदान करण्याचा संकल्प केला होता.त्या संकल्पाची पूर्तता त्यांचे चिरंजीव अमित सारोळकर यांनी अंत्यविधीसाठी आलेल्या आप्तेष्टांशी विचारविनिमय करून कुंभारी येथील रुग्णालयाशी संपर्क करुन कागदपत्रांची पूर्तता केली सोमवारी रात्री साडेआठ च्या सुमारास रुग्णालयास देह सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी विहिंप पदाधिकारी व संघ परिवारातील सदस्य उपस्थित होते.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो. विहिंपच्या वतीने त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रध्दांजली : विष्णू जगताप, जिल्हा सहमंत्री
What's Your Reaction?





