सहकारात राजकारणाचा काय संबंध?
ग्राऊंड रिअॅलिटी बघा; डीसीसी बँक निवडणुकीत राजकारण आणलं तर बँकेला टाळे लागेल : खा.उदयनराजे
(विजयकुमार पिसे)
सहकारात राजकारण शिरले तर ती संस्था संपल्यातच जमा, त्याला टाळेच लागेल, याकडे लक्ष्य वेधत डीसीसी बँकेत राजकारणाचा संबंध काय? असा थेट सवाल सातारच्या राजेंनी उपस्थित केला आहे. तसेच यामध्येही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाच विचारायचं का? ग्राऊंड रिअॅलिटी बघा ना; या शब्दात सातारा जिल्ह्यातील भाजपाच्या मंत्र्यांचा समाचार घेत घरचा आहेर दिला.
तीन दिवसांपूर्वीच सातारचे खा.उदयनराजे यांनी पत्रक काढून जिल्हा बँकेची निवडणूक पक्ष विरहित पार पाडण्याचे आवाहन केले. शिवाय त्या भूमिकेवर ठाम राहात त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी उमेदवारी अर्जही दाखल केला.
दरम्यान आरबीआयच्या नव्या निकषामुळे सलग दहा वर्षे संचालक असणार्यांना निवडणूक लढविता येणार का? याबद्दल स्पष्टता नाही. उदयनराजे सलग दहा वर्षे संचालक आहेत. तरी देखील त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे आरबीआयच्या नियमानुसार राजेंचा अर्ज मंजूर होणार का? याकडेही अनेकांचे लक्ष आहे.
यादरम्यान सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजपाचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे विधान ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले होते. त्या अनुषंगाने उदयनराजेंसमोर प्रश्न उपस्थित करण्यात आला असता, नेहमीच्या स्टाईलने त्यांनी उत्तर दिले. यामध्येही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाच विचारायचं का? ग्राऊंड रिअॅलिटी बघा; या शब्दात त्या दोन मंत्र्याचाही समाचार घेतला. तसेच सहकारात राजकारण आणलं तर बँकेला टाळे लागेल, असा इशाराही खा. उद्यनराजे यांनी दिला.
गोरे यांच्या होम पिचवर स्थानिक भाजपा नेतेमंडळी त्यांना बेदखल करीत असतील तर मग सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी का सन्मान द्यावा, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. जिल्हा बँकेचीही लवकरच निवडणूक होणार आहे. इथेसुध्दा स्थानिक नेतेमंडळी गोरेे यांना, उद्देशून टीका टिप्पणी करणे साहजिक आहे.
दरम्यान आमचे विरोधक विकृत पद्धतीनेच पुढे जातात. आम्ही सरळ जाणारे आहोत. लोकांचा न्याय आम्हाला मान्य आहे. मी या टोळीला फलटण तालुक्याच्या राजकारणात कधीही सुखाने जगू देणार नाही, हे मात्र नक्की, असा इशाराच रामराजे निंबाळकरांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन पाटील यांचे नाव न घेता दिला.
What's Your Reaction?