सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर शेगावीच्या राणावर मेघवृष्टी,संत गजानन महाराज पालखीचे सरहद्दीवर विहिंपतर्फे स्वागत
विश्व हिंदू परिषद पदाधिकारी, कार्यकर्ते, बजरंगी, दुर्गा तसेच कासेगाव, तामलवाडी, गंगेवाडी, उळेगावच्या ग्रामस्थांची हजेरी, आ.सचिन कल्याणशेट्टी, जि.प.सदस्य नेताजी खंडागळे, सरपंच यशपाल वाडकर तसेच पोलीस प्रशासन, पंचायत समिती, तहसील कार्यालय, राजकीय नेतेमंडळींकडूनही पालखी सोहळयावर पुष्पवृष्टी व स्वागत
सोलापूर | शेगावीचा राणा संत श्री गजानन महाराज पालखी सोहळा सोलापूर जिह्याच्या सीमेवर दाखल होताच मेघवृष्टीने समस्त भाविक पायी वारकर्यांना चिंब भिजवून स्वागत केले. शुक्रवारी सायंकाळी पावणेसहा वाजता तामलवाडीमार्गे पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. दुपारपासूनच उळे,कासेगाव,गंगेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ कासेगाव पाटी येथे पालखी सोहळ्याच्या प्रतीक्षेत होते. शेगावीचा राणावर एकीकडे पुष्पवृष्टी सुरू असतानाच आकाशातून मेघ देखील बरसले. हा अपूर्व सोहळा याची देही याची डोळा समस्त भाविकांना तृप्त करून गेला. यानिमित्ताने या भागात पहिल्यांदाच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे संत गजानन महाराजांसोबत वरुणराजाचे आगमन झाल्यामुळे बळीराजाही सुखावला. आता पेरण्यांची लगबग सुरू होईल, याचा आनंद समस्त शेतकर्यांच्या चेहर्यावर ओसंडून वाहात होता. यंदाच्या वर्षी प्रथमच विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पालखी सोहळ्याचे सोलापूऱ जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यात आले.
तामलवाडीहून पालखी सोहळा सरहद्द सीमेवर प्रवेश करते, यावेळी प्रशासनाकडून गजानन महाराज पालखीचे औपचारिक स्वागत होते. आणि कासेगाव पाटी येथे सर्वप्रथम जिल्ह्याच्या वतीने पंचक्रोशीतून गावकरी ग्रामस्थ आणि भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होतेे. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने पालखी सोहळा स्वागताचे आयोजन या ठिकाणी केले होते. जिल्हा अध्यक्ष विष्णू मोंढे पाटील, उपाध्यक्ष अॅड.केदार पाटील शेळगीकर, विभाग मंत्री विजयकुमार पिसे,जिल्हामंत्री जयदेव सुरवसे, सहमंत्री विष्णू जगताप, धर्माचार्य संपर्क विभागाचे प्रांत सदस्य ह.भ.प.अभिमन्यू महाराज डोंगरे, जिल्हा सहप्रमुख अविनाश माने, बजरंग दल संयोजक अभय कुलथे, सेवाकार्य विभागाचे प्रमुख राजेश यनगंटी, सहप्रमुख अरुण नंदाल, विनोद गौडा, लक्ष्मण चन्ना, सामाजिक समरसता विभाग प्रमुख चंद्रकांत कुलकर्णी कासेगावकर, दुर्गावाहिनी संयोजिका ऐश्वर्या सारोळकर, आनंद बुर्हांडे, जोतिबा गुंड, विभुते, प्रखंड मंत्री सूरज मोरे, संदीप क्षीरसागर उपस्थित होते.
कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याच्या मार्गावर फुलांचा सडा घातला होता. तसेच स्वागताची जय्यत तयारी केली होती. याठिकाणी पालखीचे आगमन होताच विहिंप जिल्हा अध्यक्ष विष्णू मोंढे, सरपंच यशपाल वाडकर यांच्याहस्ते पालखीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विहिंप कार्यकर्ते विठुनामाचा गजर करीत होते, तर आकाशातून मेघवृष्टीदेखील सुरू होती.
तसेच अक्कलकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, जि.प. सदस्य तथा उळेगावचे रहिवासी नेताजी खंडागळे यांनी देखील पुष्पहार अर्पण करून गजानन महाराज पालखीचे स्वागत केले. आज शुक्रवारचा मुक्काम उळे गावात होता. तिथे भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले होतेे.
शनिवारी सकाळी ९ वाजता रूपाभवानी मंदिर चौक येथे सोलापूर शहरात पालखीचे आगमन होते. त्यानंतर प्रभाकर महाराज मठ येथे सकाळचा विसावा तिथेच महाप्रसाद. सायंकाळी कुचन हायस्कूल येथे मुक्काम असून या ठिकाणी सर्व वारकर्यांना विणकर बाग बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने मिठाई आणि मसाले भाताचा महाप्रसाद दिला जातो.
दुसर्या दिवशी सकाळी ९ वाजता उपलप मंगल कार्यालय येथे पालखीचे आगमन होते. येथेच दिवसभर गजानन महाराज पालखीचे दर्शन घेण्याची सोय केली आहे. रविवारी मुक्कामानंतर सोमवारी सकाळी पालखी रेल्वे स्टेशनमार्गे पंढरपूर तिर्हेकडे मार्गस्थ होते.
What's Your Reaction?