सोलापूरच्या जिव्हाळ्याच्या विषयात शिंदे सेनेचे "उद्योग"
आयटी पार्क अन् लिंगायत स्मशानभूमी जागेचा गुंता; आयटी पार्कविषयी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आठवड्यातच ब्रेक, *सोलापुरी सत्ताधार्यांकडून लिंगायत समाजाची हेळसांड, त्यामुळे सेनेच्या "सामंत"शाहीचा उदय
(विजयकुमार पिसे)
सोलापुरात पूर वगैरे कधी तरीच येतो, सध्या तरी घोषणांचा महापूर जोरात आहे. राज्यात तीन पक्षांची महा(युती)सत्ता. त्यामुळे तीनही पक्ष आणि त्यांचे नेते, आश्वासन घोषणांचा महापूर झाला आहे. त्यामुळे अशा घोषणांच्या महापुराविषयी सोलापूरांची करमणूक तर होतेच,शिवाय सोलापुरी जनता अशा घोषणाबाजांविषयी देखील चांगली ओळखून आहे. आयटी पार्क आणि लिंगायत समाजाची नियोजित स्मशानभूमीची जागा. सत्ताधार्यांकडूनच गुंता केला जात आहे. या जिव्हाळ्याच्या विषयात शिंदेसेनेचे उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आठवडाभरापूर्वी घेतलेले निर्णय कधी मार्गी लागतील, याकडे लक्ष लागले आहे.
होटगी तलाव परिसरात आयटी पार्कसाठी मुख्यमंत्र्यांनी जागा निश्चित केली. जलसंपदा खात्याकडून उद्योग खात्याला (एमआयडीसीला) सदरची जागा हस्तांतरित करण्याची आदेश देखील दिले. त्यामुळे लवकरच आयटीच्या नियोजित जागेचे भूमिपूजन होईल, अशी ग्वाही दिली जात आहे. यासाठी प्रधानमंत्री मोदी यांना आमंत्रित करण्याची योजना आहे. (मोदींच्या हस्ते कुंभारी भागातील घरकुल योजनेचे विस्तारीकरण आणि तेथे उद्योग उभारणी तसेच नवीन एमआयडीसीचे भूमिपूजन प्रस्तावित आहे.)
या दरम्यान शिंदे सेनेेतील वजनदार मंत्री उदय सामंत यांनी सोलापूर दौर्यात आयटी पार्कची जागा तज्ञ मंडळींची पसंती असेल तरच. अन्यथा.. त्यांनी अन्य पर्यायी जागेचा शोध घ्या,असेही आपल्या खात्याला सुचविले आहे. सोलापुरातील उद्योजकांची पसंती देखील होटगी तलाव परिसराला नाही, शहरातच आयटी पार्कची उभारणी व्हावी, असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे राज्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी जिव्हाळ्याच्या प्रश्नात अधिक लक्ष घातले असावे. ज्यामुळे सेनेच्या स्थानिक नेत्यांनाही बळ मिळेल.
सोलापुरात लिंगायत समाज बहुसंख्येने आहे. या समाजासाठी अक्कलकोट रोडवरील नियोजित स्मशानभूमीची जागा बृहन्मठ होटगी संस्थेला की सिध्देश्वर देवस्थान समिती यावर मनपातील सत्ताधारी पक्षाकडून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. अखेर देवस्थान समितीने या प्रकरणातून अंग काढून घेतले आहे. आता या निर्णयाचा चेंडू मनपाकडेच आहे. परंतु कुरघोडीचे राजकारण चिकटलेल्या सत्ताधार्यांनी हा विषय चेष्टेचा केला आहे. त्यामुळेे काशी पीठाचे उत्तराधिक़ारी डॉ.मल्लिकार्जुन महास्वामी यांनी नाकर्त्या सत्ताधार्यांचा नादच नको, म्हणून शिंदे सेनेचे उद्योेगमंत्री उदय सामंत यांना लक्ष घालण्याचे सुचविले आहे.
गेल्या महिन्यात सामंत सोलापूर दौर्यावर आले असता तेव्हा महास्वामींनी याविषयी मागणी केली होती, यावेळच्या दौर्यात त्यांनी आठवण करून दिली. नगरविकास खाते शिंदे सेनेकडेच आहे. शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडेच नगर विकास खाते आहे. सोलापुरी सत्ताधार्यांकडून शिंदेसेनेला डावलण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यावर शिंदेसेना कोणते नवे उद्योग करून त्यांना खिंडीत गाठणार की टांगा पलटी...?
What's Your Reaction?