वाद स्मशानभूमीचा; प्रशासनाची नाहक कोंडी
आता चेंडू इंद्रभवनात,मठ मंदिर आणि समाजालाही वेठीस धरण्याचा निंद्य प्रयत्न
(विजयकुमार पिसे)
मठ, मंदिरं हिंदू समाजाची श्रध्दा, बलस्थानं. हिंदू समाजाला दिशा देण्याचं काम. पण सोलापुरातील काही राजकारण्यांना फोडा आणि झोडा ही इंग्रज/काँग्रेसी निती अवलंबून राजकीय प्रस्थ वाढवायचे आहे. कारण यांच्याकडं निरंकुश सत्ता. इंद्रभवनवरही यांचाच ताबा. त्यामुळं स्मशानभूमीची जागा देखील आमच्याच मर्जीनं दिली गेली पाहिजे. स्मशान भूमीवरूनही राजकारण? हे सूज्ञ सोलापूरकर ओळखून आहेत.
दरम्यान आता ह्या वादाचा चेंडू इंद्रभवनाच्या कोर्टात पडला असून बिचार्या प्रशासनाची नाहक कोंडी केली जात आहे. प्रशासन सुविधा उपलब्ध करून देण्यास बांधील आहे. त्यामुळे यासंदर्भात आज आयुक्त सचिन ओंबासे बैठक़ घेणार आहेत, असे समजते. त्यांची बैठक़ होईल की नाही, त्यांचा फैसला होईल की नाही, हे अनिश्चित वाटते. निरंकुश सत्तेचे परिणाम दिसत आहेत.
1985 मधील पुलोद सत्ता वगळता, महापालिकेत काँग्रेसच सत्ताधारी. सोलापूरकरांनी परिवर्तन हवंय म्हणून सत्ता भाजपाच्या ताब्यात दिली. पण आजच्या भाजपात सर्वाधिक़ काँग्रेसी. तेच कारभारी. आणि मनमानी. सोलापूरकरांना कदाचित पश्चाताप होईलही. कारण.. दररोज पाणी देणार असं भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात रोखठोक आश्वासन देणारे आता नन्नाचा पाढा वाचताहेत. ना तीन दिवसाआड, ना पाच दिवसाआड. आठवड्यातून एकदाच पाणी. आणि शहाजोगपणे म्हणतात, अन्यथा 50 टक्केच पाणीपट्टी भरू. प्रशासन व सोलापूरकरांचीही फसवणूक. नियमित पाणी देण्यासाठीचे बजेट 800 कोटींवरून आता 1600 कोटींपर्यंत गेलंय असेही समजतेे. म्हणजे? विकासाच्या गंगोत्रीची कोटी उडाणं सुरू होत आहेत.
...त्यामुळे मठ, मंदिर, हिंदू समाज आणि आता स्मशानभूमीत राजकारण असू नये, ही किमान अपेक्षा. सोलापुरात बहुसंख्येने असलेल्या लिंगायत समाजाचीही अशीच भूमिका असू शकते. *समन्वयाने मार्ग निघू शकतो. पण त्यासाठी इथे *समन्यायी हवेत. सिध्देश्वर देवस्थान आणि बृहन्मठ होटगी हे दोन्ही या समाजाची श्रध्दास्थानं आहेतच. या समाजाने स्मशानभूमीसाठी जागा मागितली. प्रशासनाने देण्याचा निर्णय घेतला. त्यात व्यक्तिगत मोठेपणा म्हणजे मनपात कालपरवा आलेल्या नगरसेवकांचे मंदिर आणि मठ यांच्यावर कृपापात्र असावे की काय? म्हणजे लोकप्रतिनिधींच्या मर्जीनेच मठ मंदिरांचा कारभार व्हावा, अशी यांची अपेक्षा असावी? अशीच वेळ आली किंवा येणार असेल तर? तेव्हा अशा राजसत्तेला धर्मदंड निश्चित आहे. इतिहासात असे काही दाखले आहेत.
त्यामुळे मठ आणि मंदिर ही हिंदूंची नेहमीच श्रध्दास्थानं आहेत, आम्ही *परिवाराची विचारधारा मानणारे आहोत. त्यामुळे आम्ही देखील याच भूमिकेतून पाहतो. आणि त्याआधारे हिंदू समाजाचे संघटन करण्याचे प्रयास आहेतच. केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वाद पेटवला जातोय. हे सोलापूरकरांनीही ओळखले आहे. मराठी साहित्यामध्ये लोण्याचा एक संदर्भ सांगितला जातो. असो.
म्हणून सुचवावेसे वाटते. स्मशानभूमीच्या जागेचे निंद्य राजकारण होत असेल तर स्वखर्चाने स्मशानभूमीची जागा उपलब्ध करण्याची क्षमता निश्चितच लिंगायत समाजात आहे. शिवाय मठ आणि मंदिरामध्ये आहे.
What's Your Reaction?