जुगाराच्या व्यसनातून हताश पाऊल; मुलाला शेवटचा मेसेज पाठवून ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

व्हॉट्सअपवरील भावनिक संदेश व्हायरल; सोलापूरमध्ये हळहळ, व्यसनाधीनतेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर

Mar 29, 2026 - 12:38
 0  20
जुगाराच्या व्यसनातून हताश पाऊल; मुलाला शेवटचा मेसेज पाठवून ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

सोलापूर | प्रतिनिधी

सोलापूर शहरात जुगाराच्या व्यसनामुळे आर्थिक व मानसिक तणावाला कंटाळून ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अनिल मारुती नरवडे (रा. मुरारजी पेठ, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी मृत्यूपूर्वी आपल्या मुलाला व्हॉट्सअॅपवर भावनिक संदेश पाठवला होता. हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, शनिवारी (दि. २८ मार्च) सकाळच्या सुमारास सोलापूर-विजापूर महामार्गावरील छत्रपती संभाजी तलाव (कंबर तलाव) परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

नातेवाईकांच्या माहितीनुसार, नरवडे हे काही काळापासून जुगाराच्या व्यसनाच्या विळख्यात अडकले होते. या व्यसनामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत गेला होता. कुटुंबाची जबाबदारी आणि वाढते कर्ज यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते, अशी माहिती समोर आली आहे.

मृत्यूपूर्वी त्यांनी मुलाला पाठवलेल्या व्हॉट्सअॅप संदेशात आपल्या चुका मान्य करत कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचे आवाहन केले असल्याचे सांगितले जाते. तसेच चुकीच्या मार्गावर जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला होता. हा संदेश व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे सोलापूरमध्ये व्यसनाधीनतेच्या वाढत्या समस्येबाबत चर्चा रंगली असून, समाजात जागरूकतेची गरज अधोरेखित होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणी नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

▪️ व्यसनाधीनतेचा वाढता विळखा

जुगार, ऑनलाईन बेटिंग, मोबाईल गेमिंग आणि इतर व्यसनांच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक कुटुंबे आर्थिक तसेच मानसिक संकटाच्या गर्तेत ढकलली जात आहेत. सहज पैसे मिळवण्याच्या मोहात अनेकजण या सवयींकडे वळतात; मात्र त्याचे परिणाम गंभीर स्वरूपात समोर येत आहेत. तज्ञांच्या मते, अशा व्यसनांमुळे व्यक्तीची निर्णयक्षमता कमी होते, कर्जबाजारीपणा वाढतो आणि कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण होतो. सुरुवातीला छंद म्हणून सुरू झालेली सवय हळूहळू व्यसनात परिवर्तित होते आणि त्यातून बाहेर पडणे क ठीण बनते. विशेषतः ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे जुगार आणि बेटिंग सहज उपलब्ध झाले असून तरुणांपासून प्रौढांपर्यंत अनेकजण त्याच्या आहारी जात आहेत. यामुळे केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. नैराश्य, एकटेपणा आणि असहाय्यतेची भावना वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

▪️  अनिल नरवडे यांनी मुलाला केलेला तो मेसेज  

"अनु, मी जे काही बोलत आहे ते माझ्या मजबुरीमुळे बोलत आहे, त्यामुळे तू रागावू नकोस. मी मुळात वाईट असल्यामुळेच हे सर्व घडत आहे. मी जुगारी असल्यामुळे आजवर हे सर्व घडत गेले आहे. आपली गाडी मी कुठे गहाण ठेवली आहे, हे तुला सांगून लक्षात येणार नाही. त्यामुळे राहुल कोळी याला सोबत घेऊन जा. मी कुठे जुगार खेळत होतो, हे त्याला माहित आहे. तिथे मी ३०,००० रुपयांत गाडी गहाण ठेवली आहे, ती सोडवणे आता तुझे काम आहे.
कृष्णा, मी माझ्या सर्व जबाबदाऱ्यांचे ओझे तुझ्यावर सोडून जात आहे, कारण मी तुमच्या लायकीचा वडील राहिलो नाही. मी वाईट मार्गाला लागलो असल्यामुळे कधीच सुधारू शकलो नाही. तुम्ही मात्र माझा मार्ग कधीच धरू नका, कारण माझा मार्ग कधीच चांगला ठरला नाही. म्हणूनच मी आता हा शेवटचा मार्ग निवडत आहे. तू फक्त भैय्या, आई आणि तुझ्या मम्मीचा सांभाळ कर. माझी अपेक्षा फक्त तुझ्याकडूनच आहे आणि मला खात्री आहे की तू माझ्या शब्दाचे पालन करशील.

मला माफ कर, मी तुमच्या लायकीचा वडील ठरू शकलो नाही. ही माझी शेवटची इच्छा समजून तू आई, भैय्या आणि तुझ्या मम्मीचा सांभाळ कर. मी शेवटच्या क्षणी तुझ्याकडे काहीतरी मागत आहे, मला खात्री आहे की तू माझी ही इच्छा पूर्ण करशील. मी तुमच्या विश्वासावर तुम्हाला सोडून निरोप घेत आहे, कारण मी स्वतःला तुमचा वडील किंवा पप्पा म्हणवून घेण्याच्या लायकीचा उरलो नाही."

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow