“कैरीचे लोणचे आणि भाजी बनव” , “अर्ध्या तासात परत येतो”

सोलापूरमध्ये १४ दिवसांपासून बेपत्ता असलेला जीम ट्रेनर सचिन माने झुडपात मृतदेह आढळला. प्रकरणी संशय व्यक्त होत असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Mar 29, 2026 - 12:22
 0  26
“कैरीचे लोणचे आणि भाजी बनव” , “अर्ध्या तासात परत येतो”

सोलापूर | प्रतिनिधी

सोलापूर शहरात बेपत्ता झालेल्या जीम ट्रेनरचा मृतदेह तब्बल १४ दिवसांनी सैफुल परिसरातील झुडपात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सचिन मच्छिंद्र माने (वय ३०, रा. विजापूर नाका, २ नंबर झोपडपट्टी) असे मृत तरुणाचे नाव असून, तो १४ मार्चपासून बेपत्ता होता. या घटनेमुळे शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन माने हा १४ मार्च रोजी पत्नी कल्याणी यांना “अर्ध्या तासात परत येतो” असे सांगून घरातून बाहेर पडला होता. जाताना त्याने घरात “कैरीचे लोणचे आणि भाजी बनव” असे सांगितल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, घरातून गेल्यानंतर त्याचा मोबाईल बंद लागला आणि तो परतलाच नाही. यामुळे चिंताग्रस्त कुटुंबीयांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, २७ मार्च रोजी सकाळी सैफुल परिसरातील एका खासगी रुग्णालयाच्या पाठीमागील काटेरी झुडपात त्याचा मृतदेह आढळून आला. यापूर्वी रात्री नातेवाईकांना त्याची दुचाकी त्या परिसरात दिसून आली होती. त्यामुळे सकाळी त्यांनी शोधमोहीम राबवली असता झुडपात मृतदेह असल्याचे लक्षात आले.

घटनास्थळी त्याचा मोबाईल आणि चप्पल आढळून आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार मृत्यू गळफासामुळे झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू आहे.

सचिन हा व्यावसायिक जीम ट्रेनर होता. त्याचबरोबर त्याचे मोबाईल शॉपीचे दुकानही होते. त्याच्या निधनामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून, त्याच्या पश्चात पत्नी कल्याणी, तीन वर्षांची मुलगी ओजस्वी आणि दीड वर्षांचा मुलगा पार्थ असा परिवार आहे. अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती.

▪️ प्रेमप्रकरणातून वादाचा संशय

सचिन हा एका जीममध्ये प्रशिक्षण देत असताना त्याची एका महिलेशी ओळख झाली होती. त्यातून दोघांमध्ये संबंध निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी या कारणावरून वाद झाल्याचेही बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित महिलेच्या पती व भावाने सचिनचा खून केल्याचा गंभीर आरोप त्याच्या पत्नी व नातेवाईकांनी केला आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

▪️ घटनास्थळी काय आढळले?

  • सैफुलजवळील एका खासगी हॉस्पिटलच्या पाठीमागील जंगलात जवळपास एक किलोमीटर दूर अंतरावर रात्री मृत सचिनची दुचाकी नातेवाईकांना दिसली. यामुळे त्यांनी सकाळी शोध सुरू केला. तेव्हा एका काटेरी झुडपात रबरी पाईपच्या सहाय्याने तो गळफास घेतलेल्या स्थितीत होता. पण त्याचा मृतदेह पूर्ण कुजलेला होता. तेथे जवळच त्याचा मोबाईल आणि चप्पल पडलेली होती. सचिनने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

▪️ पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाणे आणि संबंधित यंत्रणा विविध कोनातून तपास करत आहेत. आत्महत्येचा कोन, तसेच नातेवाईकांनी व्यक्त केलेला संशय या दोन्ही बाबींची चौकशी केली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी “घटनेमागील सत्य लवकरच समोर येईल” असे सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow