मोहोळमध्ये एसीबीचा सापळा; १० हजारांची लाच घेताना तलाठी रंगेहाथ अटक
९९ हजारांची मागणी; उर्वरित रक्कम स्वीकारताना कारवाई, महसूल विभागात खळबळ
सोलापूर | प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील वाफळे येथील तलाठी सुदर्शन रमेश जाधव (वय ३०) याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, मोहोळ तालुक्यात भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांचे इतर दोन ट्रॅक्टर चालक मित्र २७ मार्च २०२६ रोजी वाफळे गावच्या हद्दीतून ट्रॅक्टरने मुरूम वाहतूक करत होते. त्यावेळी तलाठी सुदर्शन जाधव यांनी तिन्ही ट्रॅक्टर पकडले. त्यानंतर संबंधित ट्रॅक्टरवर कोणतीही कायदेशीर किंवा दंडात्मक कारवाई न करता ते सोडून देण्यासाठी तिघांकडून प्रत्येकी ३३ हजार रुपये, असा एकूण ९९ हजार रुपयांचा हप्ता मागण्यात आला.
तक्रारदाराच्या दोन मित्रांनी प्रत्येकी ३३ हजार रुपये याप्रमाणे एकूण ६६ हजार रुपये तलाठी जाधव याला दिले होते. तक्रारदार राजकिरण सावंत यांनी २३ हजार रुपये दिले होते. मात्र, उर्वरित १० हजार रुपये दिल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही, अशी भूमिका तलाठ्याने घेतली होती. वारंवार होत असलेल्या पैशांच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने अखेर सोलापूर एसीबीकडे धाव घेतली.
तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने २८ मार्च २०२६ रोजी पडताळणी केली. या पडताळणीत तलाठी सुदर्शन जाधव याने स्वतःसाठी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी १० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने मोहोळ परिसरात सापळा रचला.
तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना तलाठी जाधव याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. यानंतर त्याच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि ७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांमध्येही संतापाची भावना व्यक्त होत असून, अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते व त्यांच्या पथकाने केली.
What's Your Reaction?