प्रभाग २६ मधील अनेक नगरात पाईपलाईनची कामे होणार
मा.नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
सोलापूर : प्रभाग क्र. २६ मधील हेरिटेज फॉर्म, ज्योती नगर, बँक कॉलनी, बंडाप्पा नगर, कोरे वस्ती, उद्धवनगर भाग १ व २, अमर नगर, स्वस्तिक नगर, शितल नगर, रजनीश रेसिडेन्सी व आर्यश रेसिडेन्सी या भागांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. माजी नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या भागात नवीन पाईपलाईन टाकण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावत असल्याने सौ. चव्हाण यांनी नागरिकांसह प्रत्यक्ष पाहणी केली होती. पाहणीत अनेक ठिकाणी पाण्याची पाईपलाईनच नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी मनपा आयुक्त ओंबासे यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
या संदर्भात संबंधित अधिकारी श्री. कंदलगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, हे काम ‘सुवर्ण जयंती नगरोस्थान’ योजनेअंतर्गत हाती घेण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. एप्रिल महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून मंजुरीनंतर लवकरच कामास सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. येत्या एक-दोन महिन्यांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी सौ. राजश्री चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करत, “कार्यकाल संपल्यानंतरही त्या सातत्याने नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून त्या काम करत असून भविष्यात आम्ही सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,” असे मनोगत व्यक्त केले.
What's Your Reaction?