भाजपात कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू,त्यासाठी विशेष प्रशिक्षण, विचार मंथन
पालकमंत्री म्हणाले, कार्यकर्त्यांच्या सन्मानाला प्राधान्य, माधव भांडारींनी भाजपाच्या गौरवाचा इतिहास उलगडला
(विजयकुमार पिसे)
भाजपात कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू. त्यामुळे कार्यकर्त्यांवर कोणत्याही बदलत्या वातावरणाचा, प्रदूषणाचा परिणाम होऊ नये. यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. राज्यात म्हाळगी प्रबोधिनी ते जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण आणि विचार मंथनाद्वारे मजबूत बांधणी सुरू आहे. शहर पदाधिक़ार्यांसाठी चिंचोली एआयडीसीत एका रिसॉर्टमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत मंथन प्रशिक्षण शिबीर पार पडले.
उद्घाटन सत्रात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य, अशी ग्वाही दिली. तर पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी जनसंघ/जनता पार्टी ते भाजपा हा पाउणशे वर्षांचा इतिहास उलगडून सांगितला. तेव्हा जुन्या कार्यकर्त्यांची छाती 56 इंच (अभिमानाने भरून आली) झाली. तर नव्या कार्यकर्त्यांना आपल्या कर्तृत्वाची जाणीव देखील झाली. कारण माधव भांडारी यांच्यासारख्या ज्येष्ठ अनुभवी आणि प्रामाणिक नेत्याचा सन्मान आणि आदर आज देखील होतो हे भूषणावह आहे.
भारतीय जनता पार्टीच्या तीन पिढ्यांमधील देवदुर्लभ कार्यकर्त्यांमुळे भाजपाला सुवर्णकाळ पाहता येत आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या सन्मानाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असेल. संघटनेपेक्षा दुसरे काहीही महत्त्वाचे नाही. पक्षाला चांगले दिवस आलेले आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मान आणि न्याय मिळाला पाहिजे, कार्यकर्त्यांनी केलला संघर्ष वाया जाऊ देणार नाही, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संगितले. त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर आ. योगेश टिळेकर, आ. देवेंद्र कोठे, माजी खा.अमर साबळे, योगेश बाचल, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे उपस्थित होते.
दोन दिवसीय निवासी शिबिराचा समारोप ज्येष्ठ भाजपा उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या मार्गदर्शनाने झाला. हमारा इतिहास आणि विकास भांडारी यांनी 1951 मध्ये स्थापन झालेला जनसंघ, 1977 मध्ये आणीबाणीत जनता पार्टीत विलय, जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर वैचारिक संघर्ष, अवहेलना, यातून 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना अशी 75 वर्षांची वाटचाल सांगितली. लोकसभेत दोन सदस्यांवरून आज अखिल विश्वात सर्वाधिक़ बलशाली असलेला पक्ष, तिची वाटचाल अभिमानास्पद आहे. विशेष करून यामध्ये कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे निश्चित भाजपात कार्यकर्त्यांची दखल घेतली जाते, हे अधोेरेखित केले.
विचार परिवार अर्थात संघ परिवाराचा विचार आणि विस्तार संघाचे पदाधिकारी रंगनाथ बंकापूर यांनी दुसर्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात सांगितला. परिवारचा विचार आणि विस्तार किती व्यापक आहे, ज्यामध्ये मनुष्य घडवण्याची प्रक्रिया गत शंभर वर्षापासून अखंडपणे सुरू असून केवळ देशासाठी आपण हा भाव आहे. शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आपले वैचारिक अधिष्ठान या विषयावर प्रबोधन केले. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून पक्षात कार्यकर्त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून काम करणार्या भारतीय जनता पार्टीचा 1980 ते 2026 हा प्रवास प्रेरणादायी असल्याचेही त्या म्हणाल्या.
राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी देशापुढील राजकीय व सामाजिक आव्हाने, आ.योगेश टिळेकर यांनी कार्यविस्तार, प्रा. मोहिनी पत्की यांनी कार्यकर्ता विकास व अपेक्षा, योगेश बाचल यांनी मन की बात व कार्यपद्धती तर अॅड. अनिकेत निकम यांनी सोशल मीडिया या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सरकारच्या कल्याणकारी योजनांविषयी आ.गोपीचंद पडळकर यांनी बहुमोल माहिती सांगितली.
दोन दिवसीय शिबिरात शहराचे पदाधिकारी, आघाडी व मोर्चा अध्यक्ष, तसेच सरचिटणीस, प्रकोष्ठ, संयोजक मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. लोकप्रतिनिधी नगरसेवक यांचे शिबीर भाईंदर येथील केशवसृष्टी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे लवकरच होणार आहे.
What's Your Reaction?