देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व संघात : पांडव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात अखिल भारतीय मंडळ सदस्य रमेश पांडव यांनी हिंदू समाजाच्या संघटनाची गरज अधोरेखित केली. संघ कोणाचीही मूळ ओळख न बदलता सर्वांना राष्ट्रीय बनवण्याचे कार्य करतो, असे सांगताना त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाने संघटित होऊन राष्ट्रहिताचा विचार करावा, असे आवाहन केले. संघ शिक्षा वर्गात सात जिल्ह्यांतील २१३ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
सोलापूर,: देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असून, पहिल्या टप्प्यात भूमीपुत्र असणाऱ्या हिंदू समाजाला राष्ट्रीय बनवावे लागेल, असे प्रतिपादन सामाजिक समरसता गतीविधीचे अखिल भारतीय मंडळ सदस्य रमेश पांडव यांनी केले.
येथील ह..दे.प्रशालेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प. महाराष्ट्र प्रांताच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप सोहळ्याप्रसंगी रमेश पांडव बोलत होते. व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे संजीव पाटील, महापौर विनायक कौंड्याल, वर्ग सर्वाधिकारी शशिकांत फिरंगे, शहर संघचालक राजेंद्र काटवे आणि वर्ग कार्यवाह प्रशांत सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. प्रारंभी भारतमाता आणि संत रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पांडव म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणाचीही मूळ परंपरा किंवा ओळख न बदलता सर्वांना राष्ट्रीय बनवतो. संघात जैन, बौद्ध, कबीरपंथी, महानुभाव, वैदिक सगळे येतात आणि देशहिताचा विचार करतात. संघाच्या शाखेत भगवा झेंडा, शिवरायांचा फोटो असतो. शाखेत 'देशभक्त कार्यकर्ता निर्माणाचे कार्य होते.
बेसावध अवस्थेतील हिंदू समाजाचे लचके तोडले जात आहेत. म्हणून समाजातील प्रत्येक स्त्री-पुरुषानी शस्त्राचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. हिंदू समाजाने आता स्वतःचे बलस्थान जागृत करून संघटित झाले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
संजीव पाटील म्हणाले, संघाला समाज मान्यता व त्यागाची परंपरा लाभली आहे. मन, मनगट आणि मेंदू मजबूत करण्याचे काम संघ शिक्षा वर्गातून झाले आहे. सात शासकीय जिल्ह्यांतील २१३ स्वयंसेवकांनी वर्गात सहभाग घेतला. यात विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिकांसह नोकरदारही होते. समारोप कार्यक्रमात दंड, नियुद्ध, समता, योगासन, घोष यांचे सादरीकरण स्वयंसेवकांनी केले. १५ मे ते ३० मे या काळात हा वर्ग आयोजित करण्यात आला होता. जिल्हा सहकार्यवाह संजीव सिध्दुल यांनी आभार मानले.
डॉ. आंबेडकरांच्या डोळ्यासमोर हिंदू समाजच होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासोबत 'हिंदू कोड बिल'ही लिहिले. हे बिल पास करण्यासाठी बाबासाहेबांनी अत्यंत आग्रह धरला होता. 'हिंदू कोड बिल हे या देशाच्या दृष्टीने संविधानापेक्षा १०० पट अधिक महत्त्वाचे आहे.' म्हणजेच, जो कोणी या समाजात काम करतो, त्याच्या डोळ्यासमोर हिंदू समाजच असतो. संघाने हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र हे शब्द स्वतःचे नाहीत, ते परंपरेतच आहेत; संघ फक्त त्याचे स्पष्टीकरण देतो,असे रमेश पांडव यांनी यावेळी सांगितले.
What's Your Reaction?