संघ शिक्षा वर्गात असाही उपक्रम, भावनाऋषी नगरातून 1 हजार पोळ्यांचे संकलन!

राष्ट्र सेविका समितीच्या वर्गात मातृशक्ती भोजन, यंदा सोलापुरात दोन संघ शिक्षा वर्ग, तरुण, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक आणि मातृशक्तींनी घडवले शिस्तीचे धडे, शहरवासीयांना घडले दोन संचलनाचे दर्शन, तर शिर्डीत विहिंपच्या शिक्षार्थ्यांचे सत्संग व गावकर्‍यांसमवेत सामूहिक भोजन

May 29, 2026 - 18:42
 0  88
संघ शिक्षा वर्गात असाही उपक्रम, भावनाऋषी नगरातून 1 हजार पोळ्यांचे संकलन!

(विजयकुमार पिसे)

  संघ शताब्दीनिमित्त गत वर्षभरापासून देश विदेशात संघाच्या उपक्रमांचे विराट दर्शन संपूर्ण समाजघटकाला होत आहे. राष्ट्र सेविका समितीचे यंदा 90 वे वर्ष आहे. यावर्षी सोलापुरात संघ शिक्षा वर्ग (सामान्य) सध्या सुरू आहे. आणि महिलांचा समिती वर्ग नुकताच पार पडला. तिथे मातृशक्तीचे सेविकांसमवेत भोजन पार पडले. 

  पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघ शिक्षा वर्गात 213 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. शहर ग्रामीण 148 संघ शाखांमधून 44 विद्यार्थी,93 तरुण आणि 76 तरुण व्यावसायिकांचा वर्ग ह.दे.प्रशालेत सुरू आहे. या वर्गाची सोलापूरकरांनीही दखल घेतली असून शहरातील भावनाऋषी नगरातून तब्बल 1 हजार पोळ्यांचे संकलन संघ स्वयंसेवकांनी केले. या उपक्रमास घराघरांमधून मातृशक्तींनीही चांगला प्रतिसाद दिला.

   संघ कार्यात पुरुषांबरोबर मातृशक्तीचेही मोठे योगदान असते, ते यानिमित्ताने पहायला मिळाले. शिवाय सामाजिक समरसतेचे दर्शनही घडले. संघ शिक्षा वर्गस्थानी सकाळ संध्याकाळ चहा,नाश्ता शिवाय भोजनही बनवले जाते. काही नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच सेवाकार्याचे धडेही गिरवले जातात. शहरातील काही भागात पोळीभाजीचे संकलन केले जाते. तर स्वयंसेवक शिक्षार्थ्यांना भोजनासाठी परिसरातील घरांमध्ये पाहुणचारही केला जातो.

*विहिंपचा गावांमध्ये सत्संग व सहभोजन*

  यंदा विश्‍व हिंदू परिषदेचा शिक्षा वर्ग शिर्डीजवळ कोकमठाण येथे आत्मा मालिक ध्यानपीठ येथे नुकताच पार पडला. परिसरातील आठ गावांमध्ये सायंकाळी सत्संग घडवण्यात आला. तेव्हा या गावांमध्ये सत्संगानंतर शिक्षार्थ्यांचे गावकर्‍यांसमवेत सामूहिक भोजन असा उपक्रम पार पडला. ग्रामस्थांनी सत्संगाचा आणि सामूहिक भोजनाचा आनंद लुटला.

   अशाच पध्दतीने सोलापूरच्या संघ शिक्षा वर्गातील शिक्षार्थीं साठी भोजन व्यवस्था म्हणून काल 1 हजार पोळ्या/चपात्या गोळा करण्यात आल्या. भावनाऋषी नगर भागातील श्रीनिवास बच्चू, बजरंग कुलकर्णी, ज्ञानेश्‍वर गवते तसेच भाजपा मंडल अध्यक्ष नागेश सरगम यांनी गीता नगर, कर्णिक नगर,एकता नगर परिसरातील विविध कुटुंबांशी संपर्क साधून तिथे सर्वप्रथम कापडी पिशव्या पोचविल्या आणि सायंकाळी चारच्या सुमारास मातृशक्तींकडून 1 हजार पोळ्या संकलन केले. संघाच्या या आवाहनाला नागरिकांनी, विशेषतः माता-भगिनींनी प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे संघ कार्य आणि समाजातील स्नेहबंध अधिक दृढ झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

*शनिवारी वर्गाचा समारोप*

  संघ शिक्षा वर्गाचा समारोप शनिवारी 30 मे रोजी ह.दे.प्रशालेच्या मैदानावर सायं.6.30 वा आहे. सोलापुरातील उद्योजक संजीव पाटील प्रमुख अतिथी आणि प्रमुख वक्ते रमेश पांडव (सामाजिक समरसता गतिविधी अ.भा.मंडळ सदस्य) हे उपस्थित राहणार आहेत. समारोप सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन वर्ग सर्वाधिकारी शशिकांत फिरंगे आणि शहर संघचालक राजेंद्र काटवे यांनी केले आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow