पदवीधर, शिक्षकसाठी भाजपाचा 'कराड पॅटर्न'

प्रदेशाध्यक्षांचे ओएसडी साखरे यांचे पुणे, सोलापूर, सातारा, सांगली,कोल्हापुरात विशेष लक्ष्य; स्था.स्व.सं. विधान परिषद निवडणुकी नंतर पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचे बिगुल?

Jun 1, 2026 - 11:52
 0  5
पदवीधर, शिक्षकसाठी भाजपाचा 'कराड पॅटर्न'

 (विजयकुमार पिसे) 
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 17 जागांसाठी राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यानंतर प्रतीक्षा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची. गत निवडणुकीत सपाटून मार खाल्लेला सत्ताधारी भाजप आता ताक देखील फुंकून पिणार आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण यांनी आपले 'ओएसडी' यांना तैनात केले असून त्यांचे पुणे विभागात विशेष लक्ष आहे. उमेदवार कोण तूर्तास ही चर्चा नाही, बहुदा आयात उमेदवारांना संधी राहील, अशी चिन्हे आहेत.
    चंद्रकांत दादा पाटील यांना दुसर्‍यांदा पदवीधर मतदार संघात निसटता विजय मिळाला. त्यानंतरच्या निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला. पुणे, नागपूरसह संपूर्ण राज्यात हक्काच्या या मतदार संघात भाजपाचा पराभव अनपेक्षित होता. पदवीधरमध्ये राष्ट्रवादी पवार समर्थक अरुण लाड आणि शिक्षकमध्ये काँग्रेसचे असगावकर विजयी झाले. या दोन्ही जागा भाजपाने गमावल्या. 
   सुशिक्षित पदवीधर आणि शिक्षक हा भाजपाचा खात्रीचा आणि परंपरागत मतदार. परंतु मतदार सदस्य नोंदणीत गाफीलपणा नडला. शिवाय विजय आपलाच हे 'गृहित' धरून भाजपाने पुरेशी खबरदारी घेतली नाही. पराभवाचे हे शल्य आहे. त्या पृष्ठभूमीवर पुणे येथे प्राथमिक आणि निर्णायक बैठक न घेता जिथे मतदार, आव्हान आणि चुरस अधिक़ तिथे बैठक़ांचे सत्र सुरू झाले आहे. 
    'कराड' येथून या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार, असा रागरंग आहे, तेव्हा या बैठकीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे ओएसडी संतोष साखरे आवर्जून उपस्थित होते. त्यांच्याकडेच या मोहिमेची धुरा सोपविली अशी माहिती आहे. विक्रमी संख्येने मतदार नोंदणी हे निवडणुकीचे पहिले सूत्र आहे. बिहार, प.बंगाल, आसाम येथील विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधक नामोहरम  झाले, *एसआयआरमुळे. हे यशाचे  गमक आहे. त्यामुळे मतदार केंद्रबिंदू मानून पदवीधर आणि शिक्षक मतदारांची अधिकाधिक नोंदणी करणे, त्यांच्या अडीअडचणी, मागण्या दूर करून त्यांना आपलेसे करण्याचे तंत्र भाजपा विकसित करणार आहे. 'कराड पॅर्टन'च्या या बैठकीत आ.अतुल भोसले, पराभूत माजी आ.भगवानराव साळुंके,पदवीधरचे विद्यमान आ.शरद लाड, पुणे विभाग मतदार नोंदणी प्रमुख डॉ.प्रथम कोल्हे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. केवळ निवडणूक लढवणे नव्हे तर गमावलेला जनाधार व गमावलेली जागा पुन्हा मिळवणे हा संकल्प आहे. 
    शिक्षक आणि पदवीधर मतदार नोेंदणी जवळपास समान असते, पण प्रत्यक्ष नोंदणीत तफावत आढळून येते, त्यामुळे ही तफावत भाजपाच्या पराभवास कारणीभूत ठरते, असा अनुभव आहे, त्यामुळे अशा दोन निवडणुकानंतर भाजपा पराभूत होते. प्रकाश जावडेकर यांचाही या मतदारसंघात पराजय झाला, त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले. तिसर्‍यांदा त्यांचा पराजय अटळ होता, या अंदाजानेच त्यांनी पुण्यातील कोथरूडची सुरक्षित जागा पटकावली. लोकप्रतिनिधी आमदारांचा 'संपर्क,संवाद आणि मतदार नोंदणीत उदासीनता' ही पराजयाची खरी कारणे आहेत, त्यासाठी प्रदेशाध्यक्षांना आपला ओएसडी तैनात करावा लागला,असे दिसते. निवडणूक जिंकण्यासाठी पक्ष व संघटनेला 'ओएसडी' हा देखील भाजपात नवा पॅटर्न ठरेल की काय?

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow