आधी लगीन.... मग रा(ज्यसभे)यबा'चे
शापित नेत्याकडे नेतृत्व शाबित करण्याची संधी नेहमीच यशस्वी
चाय पे चर्चा : विजयकुमार पिसे
विनोद तावडे म्हणजे भाजपामधील शापित नेता. पण जेव्हा जेव्हा आव्हानं सोपविली, ती तडीस नेली, असा अनुभव. दादा गेल्या महिन्यात राज्यसभेवर बिनविरोध निर्वाचित झाले. पण अद्याप शपथ घेतलेली नाही. का? अडलंय कुठं?
2014 मध्ये राज्यात सत्तांतर झालं. भाजपा,सेना युतीची सत्ता आली. राज्याचा गृहमंत्री कोण? ही चर्चा जेव्हा रंगली, तेव्हा पहिलं नाव होतं विनोद तावडेंचं. पण तावडे झाले शिक्षणमंत्री. विनोदजी अभाविपमधून आलेले. त्यांच्याशी निगडित शिक्षण खातं होतं. त्या कार्यक़ालात शिक्षण क्षेत्रात काही चांगले निर्णयही झाले. अभाविपमधील त्यांचेच सहकारी चंद्रकांत दादा, राज्याचे सार्व.बांधकाममंत्री दादा पाटील तेव्हा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष देखील होते. (दुहेरी लाभाचं पद). 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या दादांनी छोट्या दादांचं तिकीटच कापले. राज्याचे गृहमंत्रीपदाची स्वप्नं पाहणार्या नेत्याच्या नशिबी आमदारकीही राहिली नाही. दादांची राज्यात अडसर नको म्हणून.
मग दिल्लीश्वरांनी बोलावणं धाडलं. तावडे आणि पंकजाताई दिल्लीत गेले. राष्ट्रीय चिटणीस पहिली जबाबदारी. हळुहळू जबाबदार्या वाढत गेल्या.(पद नव्हे) त्या यशस्वीपणे पार पडल्या. राष्ट्रीय सरचिटणीस झाले. तरीही राज्यसभेची हुलकावणी सुरूच. चर्चेत नाव मात्र यायचं. अखेर सहा वर्षांनी दादांना राज्यसभेवर संधी मिळाली. या दरम्यान बिहार असो वा राजस्थान. अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून दादांनी पक्षाला चमकवलं.
सध्या केरळ, तमीळनाडू, पाँडिचेरी,आसाम आणि प.बंगालच्या निवडणुका सुरू आहेत, यामध्ये दादा व्यस्त. ते केरळचे प्रभारीदेखील आहेत, याठिकाणी भाजपाला चमत्कार अपेक्षित आहे. गतवेळेपेक्षा काही जागा वाढल्या तर आश्चर्य वाटू नये. या सार्या मोहिमा पार पाडल्यानंतरच विनोद तावडे राज्यसभेची शपथ घेणार आहेत म्हणे. त्यांच्या दृष्टीने आधी लगीन कोंढाण्याचे. मग रायबाचे. रायबाचे अर्थात राज्यसभेचे सदस्यत्व. "शापित" नेता, (संघर्ष)किल्ला लढवण्यासाठी अजूनही "शाबित" आहे नाही का?
What's Your Reaction?