महायुतीत महाबंडाचे वारे, निष्ठावंत देखील अस्वस्थ

विधान परिषदेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी, दोस्तीत कुस्ती;जयंत पाटील आणि संजय काकडे यांचा गुपचूप डाव

Jun 2, 2026 - 11:04
 0  10
महायुतीत महाबंडाचे वारे, निष्ठावंत देखील अस्वस्थ

(विजयकुमार पिसे)

महायुतीमध्ये सारं काही आलबेल आहे, या दाव्यात कितपत तथ्य आहे? स्था.स्व.सं. निवडणुकीत भाजपा,शिवसेना आणि राष्ट्रवादीत जागा वाटपाचा फार्म्युला ठरला तरी १ जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या शिडात महाबंडाचे वारे शिरल्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षांतर्गत निष्ठावंत आणि आयाराम गयाराम असा सुप्त संघर्ष देखील महायुतीमध्ये दिसून येत आहेे. या राड्यात जयंत पाटील आणि संजय काकडे या दोन नेत्यांनी मात्र गुपचूप डाव साधला आहे. 

   विधान परिषदेच्या १६ जागांसाठी आज अखेरच्या दिवशी सारं काही आलबेल नाही, याची प्रचिती आली. मात्र माघारच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल. काही बंडोबा तलवारी म्यान करतील. पण याचे पडसाद महायुतीमध्ये उमटत राहणार हे नक्की. शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार आणि रमेश बारसकर यांची भूमिका थेट भाजपाविरोधात आहे. त्यामुळे त्यांच्या माघारीकडे लक्ष राहणार आहे.

  छ. संभाजीनगर-जालनाची जागा भाजपाने काढून घेतली. गतवेळी येथे शिवसेनेचे आमदार होते. तरीही सेनेचा दावा माघारला. भाजपकडून इनकमिंग सुहास शिरसाट यांच्या विरोधात अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच सत्तार यांनी भाजपवर टीका करताना सेनेला संपविले जात असल्याची खदखद व्यक्त केली.

   सोलापुरात बंडखोरीचा झेंडा शिंदे सेनेचे रमेश बारसकर यांनी फडकवला आहे. बार्शी तालुक्यात शत प्रतिशत भाजपा,तरीही राजेंद्र राऊत विधानसभेत शिंदे सेनेकडून लढताना दिलीप सोपलांकडून पराभूत झाले. आता राऊतां विरोधात बारसकर यांनी अर्ज भरताना पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूरचे पालक नसून दोन आमदारांचे चालक आहेत, अशा भाषेत त्यांनी जहरी टीका केली. 

  रायगडात तटकरे/गोगावले वादावर पडदा पडला असतानाच शिंदेसेनेचे आ.महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. युतीत ही जागा राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांना जाहीर झाली आहे. नाशिकची जागा देखील सेनेच्या वाट्याला आली आहे. नरेंद्र दराडे यांनी अर्ज दाखल करताच भाजपचे गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे गीते परिवार संकटमोचक गिरीश महाजनांचे समर्थक आहेत. अमरावती भाजपा लढणार आहे. तिथे भाजपाचे प्रवीण पोटे उमेदवार आहेत. पण शिंदेसेनेचे विप्लव बजोरिया यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. 

   भाजपा नेते संजय काकडे यांनी गुपचूप खेळी करत आपले पुत्र विक्रम केकडे यांना हातात घड्याळ बांधायला लावून राष्ट्रवादीची जागा फटकावली आहे. केकडे यांच्या खेळीमुळे निष्ठावंत दुखावले आहेत. यामुळे स्वत: सुनेत्रा वहिनी बंडोबांना थंड करणारे आवाहन करत होत्या. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील टिंगरे यांनी डमी अर्ज भरला आहे. या पक्षाचेे इच्छुक सुरेश घुले आणि सुनील टिंगरे नाराज आहेत. जयंत पाटील यांनी सातारा/सांगलीची जागा न लढवता त्यांचा भाचा प्राजक्त तनपुरे यांस भाजपात जाण्यास प्रोत्साहित करून सूचक मौन पाळले आहे. तनपुरे भाजपात येताना तिकीट घेऊनच आले, हे विशेष.

   अमरावती महायुतीत बंडखोरी झाली आहे. अमरावती विधान परिषदेची जागा ही भाजपसाठी सुटली आहे. प्रवीण पोटे उमेदवार आहेेत. तर शिवसेनेच्या विप्लव बजोरिया यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. धाराशिव/लातूरमधून इनकमिंग बसवराज पाटील, तोच पॅटर्न नांदेडमध्ये झाला आहे. अशोक चव्हाण समर्थक अमर राजूरकर यांना भाजपाने संधी दिली आहे. या दोन्ही मतदारसंघातून निष्ठावंतांना डावलले गेले, ही भावना व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow