कुंपणच शेत खातंय, मनपा अतिक्रमण विभाग स्क्रॅप चोर!
अमोल शिंदेंनी रंगेहाथ टेेंपो पकडला, कथित बुलडोझर बाबा बनसोडेंसह ८ जणांवर गुन्हा
सोलापूर : कुंपणच शेत खातंय, तर करायचं काय? सोलापूर मनपाच्या भ्रष्ट कहाण्यांची मालिका किती चालवता येईल, तेवढी कमीच. अतिक्रमण खात्यात अलिकडे *बुलडोझर बाबाची दहशत आणि कौतुकही. पण आज याच विभागात स्क्रॅप चोरीचा प्रकार रंगेहाथ सापडला. शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे यांना याची खबर लागताच त्यांनी गोडावूनवर धाड घातली, तेव्हा टेंपोत चोरीचा भंगार आढळून आला. याप्रकरणी अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.
या विभागाचे नियंत्रण अधिकारी अविनाश वाघमारे यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. सोमवार दि. १८ रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास एक छोटा हत्ती टेंपो (क्र.एमएच 13 सीयू 1583) वाहनात पालिकेच्या भंगार गोडावून येथून लोखंडी स्क्रॅप भरत असताना रंगेहाथ पकडण्यात आले.
अतिक्रमण विभाग अतिक्रमण हटवताना काही माल, वस्तू,साहित्य जप्त करते. नंतर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून साहित्य ताब्यात देते, असा हा सर्वसामान्य नियम. परंतु कुंपणच शेत खातंय, तसेच तळे राखेल तो पाणी पिईलच. अशा पध्दतीने राजरोस भ्रष्टाचाराचा मामला. सोमवारी टेंपोमधून भंगार भरताना अमोल शिंदे यांनी रंगेहाथ पकडला. या दरम्यान तेथील काही कर्मचारी पसार झाले. अमोल शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, सभागृह नेते नरेंद्र काळे यांना पाचारण केले.
अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने भंगार चोरीचा भांडाफोड झाला आहे. मनपा ताब्यातून प्रशासकीय मालमत्ता चोरीची फिर्याद या विभागाचे नियंत्रण अधिकारी अविनाश वाघमारे यांनी दाखल केली. त्यानुसार अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे, सचिन गाडे, दिपक कुंभार, देखरेख करणारे तीन कर्मचारी, जमीर हैदर इनामदार, तीन अनोळखी व्यक्ती अशा ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
What's Your Reaction?