हिंदू मंदिरे हिंदूंच्या ताब्यात द्या : वि.हिं.प.ची मागणी
सरकार व न्यायालय यांचं हे काम नाही : मिलींद परांडे संघटन महामंत्री
(विजयकुमार पिसे)
प.बंगालमध्ये भाजपाला मिळालेलं बहुमत, लव्ह जिहाद आणि हिंदू मंदिराबाबत विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे शिर्डीत माध्यमांशी बोलत होते.
शिर्डी (अहिल्यानगर)- "देशातील सर्व हिंदू मंदिरे हिंदूंच्या ताब्यात देण्यात यावीत. सरकार आणि न्यायालय यांचे मंदिर सांभाळण्याचं काम नाही. हिंदूंची मंदिरे सरकारनं हिंदूंच्या ताब्यात द्यावीत, यासाठी आम्ही देशभर प्रयत्न कतोय. त्यासाठी खासदार व मुख्यमंत्र्यांनाही भेटत आहोत", असे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना सांगितले.
"हिंदू समाजाच्या मंदिरांचा विचार हिंदूच करणार आहे. देशातील विविध हिंदू संघटना एकत्र आल्या आहेत. आम्ही देशातील सर्व खासदारांना आणि प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून जनजागृती करत आहोत. यावर्षाच्या अखेरीपर्यंत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि खासदार लोकसभेसह विधानसभेत आमचा विषय मांडणार आहेत", असेही मिलींद परांडे म्हणाले. "कोणतेही चर्च आणि मशीद सरकारच्या नियंत्रणाखाली नाही. त्यामुळे देशातील सरकारच्या ताब्यातील सर्व हिंदू मंदिरे हिंदूंच्या ताब्यात देण्यात यावीत", अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री परांडे शिर्डी साई मंदिर दर्शन व विहिंप शिक्षा वर्ग (कोकमठाण) येथे आले असता त्यांनी माध्यमांशी तसेच तीन सत्रान्मधून विहिंप कार्यकर्ते यांचेशी संवाद साधला.
*बंगालमध्ये भाजप विजयाचा आनंद*
पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार पहिल्यांदाच आलं आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हिंदू हिताचा विचार करणारे लोकच केंद्र आणि राज्याच्या सत्तेवर बसावेत, असा आमचा विचार आहे. हिंदू हित हेच देशहित आहे. हिंदू संस्कृती हीच देशाची संस्कृती आहे. त्यामुळे हिंदू विचारांचे लोक बंगालमध्ये असतील तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि पश्चिम बंगालच्या हितासाठी चांगले आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू होती. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानं देशाच्या सुरक्षेसाठी चांगलं झालं आहे", असेही विश्व हिंदू परिषद केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी सांगितलं.
देशात वाढत्या लव्ह जिहादच्या विषयी मिलिंद परांडे म्हणाले की, हिंदू समाजाला सक्षम व्हावे लागणार आहे. दुर्दैवानं एक वर्ग लव्ह जिहादच्या घटना नियोजनबद्ध पद्धतीनं करत आहेत. संसदेमधील आकडे सांगतात की, मागील वर्षी 18 हजार कोटी रुपये एफसीआरए अंतर्गत मिशनरींना देण्यात आले आहेत. हिंदू धर्माविरोधात पैसे दिले जात आहेत. यावर बंदी घातली पाहिजे. धर्मरक्षणासाठी प्रत्येक राज्यात विधेयक मंजूर झाले पाहिजे. काही राज्यांमध्ये धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झाला आहे. हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला पाहिजे", अशी मागणीही केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी याप्रसंगी केली.
What's Your Reaction?