चाकोते घराण्यात प्रॉपर्टीचा वाद चव्हाट्यावर

माजी आ. चाकोते म्हणाले, मोठ्या भावाने व पुतण्याने 18 एकर जमीन लाटली, महादेवप्पांचा पलटवार; माझा भाऊ वैफल्यग्रस्त, नवसमता ट्रान्सपोर्टशी संबंध नाही! फसवणूक प्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल

Dec 19, 2024 - 06:59
 0  668
चाकोते घराण्यात प्रॉपर्टीचा वाद चव्हाट्यावर

सोलापूर : सोलापुरातील काँग्रेसचे नामांकित घराणे चाकोते परिवारात प्रॉपर्टीचा वाद चव्हाट्यावर आला असून माजी आ. विश्‍वनाथ चाकोते यांनी कारंबा येथील 18 एकर जमीन लाटली म्हणून मोठे बंधु महादेवप्पा चाकोतेे आणि त्यांचे पुत्र जयशंकर यांच्याविरोधात सदर बझार पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात तहसीलदारानेही मदत केली असा आरोप केला आहे. तर महादेवप्पा चाकोते यांनी धाकट्या भावावर पलटवार करीत विश्‍वनाथ वैफल्यग्रस्त असून नवसमता ट्रान्सपोर्टशी त्यांचा काही संबंध नसल्याचे नमूद केले आहे. गड्डा यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर चाकोते घराण्यातील वाद समोर आल्यामुळे समाजात तर्कवितर्क व्यक्त होत आहे.

शेत जमिनीवर परस्पर नाव नोंदवून मोठ्या भावानेच तहसीलदाराच्या मदतीने माजी आमदाराची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांत तिघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. महादेव बाबुराव चाकोते, जयशंकर महादेव चाकोते आणि तत्कालीन तहसिलदार उत्तर सोलापूर यांच्याविरोधात फिर्याद दिल्यामुळे प्रथमदर्शनी हे तीन आरोपींची नावे समोर आली आहेत.

   याबाबतची अधिक माहिती अशी की, सोलापूर शहर उत्तरचे कांग्रेसचे माजी आमदार विश्‍वनाथ बाबुराव चाकोते यांची शेतजमीन उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे गट नं.112/1 अशी असून त्यावर विश्‍वनाथ चाकोते व मोठा भाऊ महादेव चाकोते यांच्यासह चारजणांचे नावे होती. ती जमीन आमच्या कब्जे वहिवाटीत असताना मोठा भाऊ महादेव चाकोते यानी आम्हाला कसलीच माहिती न देता आमचे नाव कमी करून परस्पर शेतजमिनीवर तत्कालीन तहसिलदार उत्तर सोलापूर यांच्या मदतीने स्वतःचे आणि त्यांचा मुलगा जयशंकर महादेव चाकोते यांचे नाव लावून घेतले. तसेच नवसमता ट्रान्सपोर्ट या आमच्या वडिलोपार्जित व्यवसायाच्या नावाने हैदराबाद येथील ऑटो नगरमध्ये असलेली जमीन परस्पररित्या आमचे नाव वगळून आम्हाला कोणतीही माहिती न देता मूळ कागदपत्रे गहाळ करून नव्याने बनावट कागदपत्रे तयार करून बाबुराव चाकोते यांचा मीच एकटा वारसदार आहे असे भासवून अधिकार्यांशी संगनमत करून आपली फसवणूक केली तसेच तुम्ही कसे जमीन घेता ते बघतो अशी फिर्याद सोलापूर सदर बझार पोलीस ठाण्यात गुरनं.975/2024 प्रमाणे आणि हैदराबाद येथील हयात नगर पोलीसांकडे गुरनं.687/2021 अन्वये दिली असून या प्रकरणी पोलिसांनी 420 फसवणुकीचा गुन्हा दाखल केला, अशी माहिती फिर्यादी विश्‍वनाथ चाकोते यांनी दिली आहे.

  दरम्यान या प्रक़रणी महादेवप्पा चाकोते यांनी खुलासा करताना, नवसमतामध्ये विश्‍वनाथ यांचे नाव नव्हतेच. वडील बाबुराव यांचे 2003 मध्ये निधन झाल्यानंतर माझ्यासह सिध्दाराम, संजय यांची नावे जी (पार्टनर) पूर्वीपासून होती. ती कायदेशीर झाली आहेत. विश्‍वनाथ वैफल्यग्रस्त असून ते ज्यांची नावे घेतात, यामध्ये आलुरे गुरुजी (जे हयात नाहीत). मधुकरराव चव्हाण यांनी फोन केला असता, त्यांचा फोन (विश्‍वनाथ) घेत नाहीत. तसेच अन्य नेतेमंडळींनीही त्यांना दाद दिली नाही. तर काडादी यांनी, हा तुमच्या घरातील मॅटर आहे, तुम्हीच मिटवून घ्या असे म्हणाल्याचे महादेव चाकोते यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow