विठुरायांंच्या भक्तांसाठी गुड न्यूज! आता कमी वेळेत घडणार दर्शन
पंढरपूर दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी 129 कोटींच्या आराखड्याला मान्यता

सोलापूर : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासासाठी सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या बृहद आराखड्याला आज पार पडलेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
प्रस्तावित दर्शन मंडपमध्ये पिण्याच्या पाण्याचे सुविधा, शौचालय, लिफ्ट सुविधा, वैद्यकीय सुविधा, अल्पोपहार आपत्कालीन मार्ग प्रसाद व सुरक्षा व्यवस्था हिरकणी कक्ष व दिव्यांग सुविधा अत्यावश्यक वाहन व्यवस्था आदी सुविधा असणार आहेत. प्रशस्त दर्शन मंडप असल्याने भाविकांना सुरक्षित सुसह्य सुविधायुक्त दर्शनाची सोय होणार आहे. स्काय वॉक असल्याने स्थानिकांना दर्शन रांगेचा कोणताही त्रास होणार नाही. तसेच भाविकांचा दर्शनाचा कालावधी कमी करणे शक्य होईल. तसेच भाविकांना अन्नछत्राच्या माध्यमातून विनामूल्य जेवणाची सुविधा पुरवली जाणार आहे.भाविकांना कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन टोकन यंत्रणा उभारण्यात येईल ज्यामुळे भाविकांना कमी वेळेत दर्शन करता येईल.
याशिवाय राज्यातील अन्य प्रमुख स्थानी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. भगूर (जि. नाशिक) येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क. त्यासाठी ४० कोटींच्या प्रस्तावास व पहिल्या टप्प्यातील १५ कोटींच्या तरतुदीस मान्यता, अमळनेर (जि. जळगांव) येथील देशातील एकमेव अशा मंगळग्रह देवस्थानच्या २५ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता, कोयना जलाशय येथील जलक्रीडा पर्यटन सुविधासाठी ४७ कोटींची अतिरिक्त मागणीस मान्यता,
अमरावती : दर्यापूर येथील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी ऋणमोचन येथील १८ कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी,
श्री क्षेत्र गहिनीनाथगड (जि. बीड) विकास आराखड्यातील २ कोटी ६७ लाखांच्या कामांस मान्यता, २६/११ दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाबलाजीवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या सातारा : केंडबे येथील मुळगांवी स्मारक उभारणीस १५ कोटींची तरतूद, नागपूर : लक्ष्मीनारायण शिवमंदिर - नंदनवनला २४ कोटी ७३ लाखांचा विकास आराखडा मंजूर.
What's Your Reaction?






