देवीच्या मंचकी निद्रेस आजपासून प्रारंभ, ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना
१२ ऑक्टोबरला दसरा, यंदा पालखीवर कुंकवा ऐवजी फुलांची उधळण

तुळजापूर : कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास ३ ऑक्टोबर पासून घटस्थापनेने सुरुवात होणार आहे. आज मंगळवारपासून देवीची मंचकी निद्रा सुरू होत आहे. यंदा दसरा १२ऑक्टोबरला आहे.
आज मंगळवार, दि. २४ सप्टेंबर २०२४ पासून देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे तर १३ ऑक्टोबर २०२४ ला सिमोल्लंघनाने तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा समारोप होणार आहे. त्यामुळे आता देवीच्या भक्तांनी नवरात्रोत्सवाची तयारी सुरू केली आहे. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मंचकी निद्रा संपल्यानंतर तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्याचदिवशी दुपारी १२ वाजता मंदिरात विधीवत घटस्थापना केली जाणार आहे. ७ ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत तुळजाभवानी देवीच्या विशेष अलंकार पूजा मांडण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी रथालंकार, त्यानंतर मुरलीअलंकार, शेषशाही अलंकार, भवानी तलवार अलंकार आणि शेवटी महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा देखाव्यासह मांडली जाणार आहे.
१२ ऑक्टोबर रोजी दुपारी धार्मिक विधी पार पडल्यानंतर नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.
या दिवशी रात्री नगरहून येणा-या मानाच्या पलंग पालखीसमवेत मिरवणूक आणि १३ ऑक्टोबरला पहाटे विजयादशमीच्या दिवशी तुळजाभवानी देवीचे सिमोल्लंघन होणार आहे.
*पालखीवर यंदा फुलांची उधळण*
तुळजापूर येथे सिमोल्लंघनात देवीच्या पालखीची मिरवणूक निघते. यावेळी पालखीवर यंदा कुंकवाऐवजी फुलांची उधळण करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला. या निर्णयाचे भक्तांमधून स्वागत करण्यात येत आहे.
What's Your Reaction?






