माजी आ.दीपकआबांच्या प्रॉपर्टीचा लिलाव
पुणे जिल्ह्यातील बँकेची कारवाई; डीसीसी बँकेतही टांगती तलवार

शरद पवार गटाचे नेते आणि विधानसभा निवडणूक ठाकरे गटाकढून लढलेले माजी आमदार दीपक आबा साळुंके यांच्या माढा तालुक्यातील प्रॉपर्टीचा लिलाव येत्या 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक ही अवसायानात गेलेली बँक असून या बँकेतील थकीत कर्जापोटी माढा तालुक्यातील (खैराव) तीन ठिकाणच्या जमिनी बँकेने यापूर्वीच ताब्यात घेतल्या आहेत. गेल्या आठवड्यात अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचेे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे आणि दत्ता शिंदे यांच्या मातोश्री शुगरवरील 75 कोटींच्या थकीत कर्जापोटी पीएनबी बँकेने त्यांच्या प्रॉपर्टीचा प्रतीकात्मक ताबा घेतला होता. सहकार क्षेत्रात एकाच आठवड्यात अशा दोन घटनांनी नेत्यांच्या कर्जप्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेेकडून सांगोला तालुक्यातील जवळा शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष दीपकआबा साळुंके पाटील यांनी कर्ज घेतले होते. त्यांच्यावर 27.56 कोटींचे कर्ज थकीत आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेने माढा तालुक्यातील तीन ठिकाणच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. त्या जागांचे यापूर्वीही लिलाव पुकारले होते. पण प्रतिसाद न मिळाल्यामुळे बँकेला पुन्हा लिलाव पुकारावा लागला आहे. माढा तालुक्यात खैराव येथे 12 हेक्टर 63 आर, 15 हेक्टर 63 आर आणि 15 हेक्टर 68 आर या जमिनी गहाणखताद्वारे तारण ठेवलेल्या होत्या. दरम्यान शिवाजीराव भोसले सहकारी बँक अवसायानात गेली. वसुली अधिकारी बी.बी. दरवडे यांनी सदर जमिनींचा लिलाव पुकारला होता. पण हवा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे दीपक आबा यांच्या जमीन प्रॉपर्टीचा पुन्हा लिलाव पुकारावा लागला आहे.
गेल्या आठवड्यात राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील सोलापूर दौर्यावर आले असता माजी आ. दिलीप माने यांच्या निवासस्थानी दीपकआबांनी मंत्र्यांची भेट घेतली होती. सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या बेकायदा कर्ज प्रकरणातील वसुली यादीत संचालक म्हणून दीपकआबांचे नाव आहे. सदरच्या कारवाईची टांगती तलवार आहे. त्यासाठी ही भेट असावी, अशी चर्चा होती. त्यानंतर आठवडाभरातच शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या कर्ज प्रकरणाची कारवाई समोर आली. त्यामुळे सहकारात सबकुछ माफ, हे दिवस आता राहिलेले नाहीत, असाच त्याचा अर्थ काढता येईल काय?
What's Your Reaction?






